छत्रपती संभाजी नगर – जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील पहुरी बुद्रुक शिवारात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शेतातील गोठ्यात दावणीला असलेल्या शेळ्यावर बिबट्याने हल्ला करुन पाच शेळ्यांना ठार मारल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, या घटनेत जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पहुरी बुद्रुक गावातील शेतकरी रामदेव रामहरी गव्हाले यांची गट नंबर ७५ मध्ये तीन एकर जमीन आहे. याच शेतीस जोडधंदा म्हणून त्यांनी शेळी पालन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्याजवळ जवळपास अठरा शेळ्या होत्या. शेळ्या पत्र्याच्या गोठ्यात बांधल्या होत्या. मात्र मध्यरात्री बिबट्याने अचानकपणे या शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्या, तर चार शेळ्या जखमी झाल्या. गुरुवारी सकाळी शेतकरी शेतात गेल्यावर ही घटना घडलेली निदर्शनास आली याबाबत घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानुसार वनसंरक्षक एफ.जी.मुलताने यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.