वॉशिंग्टन – गेले पाच महिने अंतराळात अडकून पडलेल्या अमेरिकेच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांच्या ताज्या फोटोमुळे जगभरातील खगोलप्रेमींची चिंता वाढली आहे. या फोटोमध्ये सुनिता विल्यम्स अगदी कृश आणि वयस्कर दिसत आहेत. त्यांचे गाल बसले असून, शरीरही आकसल्यासारखे दिसते. त्यांची प्रकृती गेल्या पाच महिन्यांत झपाट्यात खालावली हे या फोटोवरून स्पष्ट समजते. अशा परिस्थितीत त्यांना आणखी अडीच महिने अवकाश स्थानकावरच राहावे लागणार असल्याने चिंता वाढली आहे.
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या अंतराळवीर भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे 6 जून रोजी अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर गेले होते. मात्र त्यांना पृथ्वीवर परत घेऊन येणार्या यानात तांत्रिक बिघाड झाल्याने हे दोन अंतराळवीर सुमारे पाच महिने अवकाश स्थानकावरच अडकून पडले आहेत. नासाच्या वैज्ञानिकांनी यानातील बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे सुनिता विल्यम्स आणि विल्मोर यांना न घेताच यान पृथ्वीवर परतले. त्यानंतर गेल्या महिन्यात नासाने दुसरे अंतराळयान अवकाश स्थानकावर पाठविले. हे दुसरे यान अवकाश स्थानकाशी जोडलेही गेले आहे.
मात्र नासाच्या नियोजनानुसार पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यातच अंतराळवीरांना घेऊन हे यान पृथ्वीवर परतणार आहे. तोपर्यंत त्यांना तिथेच राहावे लागणार आहे. अंतराळात पृथ्वीच्या निम्न कक्षेत फिरत असलेल्या अवकाश स्थानकामध्ये सुक्ष्म गुरुत्वाकर्षणाची स्थिती असते. अत्यंत कमी गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळवीर स्थानकामध्ये अक्षरशः तरंगत असतात. अशा परिस्थितीत जगणे अत्यंत जिकिरीचे असते. सुक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे मानवी शरीरावर प्रतिकूल परिणाम होतात. हे सर्व सुनिता विल्यम्स यांच्या या फोटोमधून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच जगभरातील खगोलप्रेमी चिंतेत
पडले आहेत.