मुंबई
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरुद्ध बजावलेल्या जामीनपात्र वॉरंटला विशेष एनआयए न्यायालयाने स्थगिती दिली. न्यायालयाने प्रज्ञासिंह यांना कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, यानंतर देखील सुनावणीला हजर न राहिल्यामुळे विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी प्रज्ञासिंह यांना १० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट बजावले होते. प्रज्ञासिंह यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे त्या न्यायालयात हजर राहू शकल्या नाहीत, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली. यानंतर न्यायालयाने प्रज्ञासिंह यांच्या विरोधातील वॉरंटला स्थगिती दिली.
विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावत त्यांना सुनावणीला व्यक्तिशः हजर राहण्याचे सक्त आदेश दिले होते. मात्र, त्या सुनावणीला हजर राहू शकल्या नाहीत. याबाबत प्रज्ञासिंह यांच्या वकीलांनी काल न्यायालयात स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, प्रज्ञासिंह सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे न्यायालयाचे वॉरंट अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही. वकिलांच्या या स्पष्टीकरणानंतर न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंग यांना तात्पुरता दिलासा देत प्रज्ञासिंह यांच्या विरोधातील वॉरंटला स्थगिती दिली आहे. २७ मार्चला त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.