वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या एका दीर्घकालीन अवकाश मोहिमेवर तब्बल सात महिने आंतरराष्ट्रीय तळावर राहून सर्वात वयोवृध्द अंतराळवीर डॉन पेटीट काल आपल्या सत्तराव्या वाढदिवशी सुखरुप पृथ्वीवर परतले.
सोयूझ एमएस-२६ या अंतराळ कुपीमधून (स्पेस कॅप्सूल) पॅराशुटच्या साह्याने रविवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजून २० मिनिटांनी पेटीट आणि त्यांचे दोन रशियन सहकारी अॅलेक्सी ओव्हचिनीन आणि इव्हान वॅग्नेर कझाकिस्तानमध्ये अलगद उतरले.
पेटीट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मोहिमेत आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर २२० दिवस वास्तव्य केले. या कालावधीत त्यांनी पृथ्वीभोवती तब्बल ३ हजार ५२० प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत.
पेटीट यांच्याबद्दल सांगायचे तर वयाची सत्तरी गाठलेल्या पेटीट यांची ही चौथी अंतराळ मोहीम होती. या चार मोहिमांमध्ये मिळून पेटीट यांनी आतापर्यंत अवकाशात एकूण ५९० दिवस वास्तव्य केले आहे. अंतराळ मोहिमांचा त्यांना २९ वर्षांचा अनुभव आहे.
