विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या विशेष अधिवेशनासाठी सकाळपासूनच विधानसभेच्या आवारामध्ये आमदारांची लगबग दिसून आली. सकाळी दहा वाजल्यापासून नवनिर्वाचित सदस्य विधानसभेत दाखल होऊ लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपआपल्या पक्षांच्या आमदारांसोबत विधानसभेत दाखल झाले. त्याच वेळी विधानसभेच्या पायऱ्यांवरच अचानक उद्धव ठाकरेंचे पुत्र तसेच वरळी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस समोरासमोर आले. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
अधिवेशनासाठी वरळीचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे विधानसभेच्या पायऱ्यांवर पोहचले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथेच उभे होते. आदित्य ठाकरेंनी त्यांना पाहताच हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मुख्यमंत्र्यांनीही हसत हसत हात पुढे केला, दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. आदित्य ठाकरेंनी फडणवीसांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले, तर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना निवडणूक जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तिथे असलेल्या फोटोग्राफरनी फोटोसाठी आग्रह केला. परंतु आदित्य ठाकरेंनी नको राहू दे, असे म्हणून फोटोला नकार दिला. अगदी काही सेकंदासाठी झालेली दोघांची ही भेट विधानसभेमध्ये चर्चेचा विषय ठरली.