नवी दिल्ली – ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक उद्या लोकसभेत सादर होणार नाही. नव्याने जाहीर झालेल्या सुधारित कार्यसूची यादीत या विधेयकाचे नाव नमूद नाही. यापूर्वी या विधेयकाचा उद्याच्या कार्यसूचीत समावेश केला होता. दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरला संपणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने १२ डिसेंबरला लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी दिली होती. या विधेयकानुसार मंत्रिमंडळाने दोन मसुदा कायद्यांना मंजुरी दिली होती, त्यापैकी एक घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या एकाचवेळी निवडणुकांशी संबंधित असून , दुसरे विधेयक विधानसभेच्या तीन केंद्रशासित प्रदेशांसाठी एकाचवेळी निवडणुका घेण्याशी संबंधित आहे. कोणतेही घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असते, तर दुसऱ्या विधेयकासाठी सभागृहात साधे बहुमत आवश्यक असते. तूर्त दोन्ही विधेयके उद्या संसदेत सादर केली जाणार नाहीत.