लोकसभेत पराभव! विधानसभेला तरी यश मिळू दे अजित पवार गटाचे सिद्धिविनायकाला साकडे

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर येत्या काही महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी सर्व पक्षांनी आतापासूनच सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेला अजित पवार गट विधानसभा निवडणुकीत तरी चांगले यश मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रयत्नात कसलीही कसर राहू नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या आमदार आणि मंत्र्यांसह मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी आशीर्वाद द्या, असेही साकडे सिद्धिविनायकाला घातले. देवदर्शन घेऊन अजित पवार आता 14 जुलैला प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत.
अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्री आणि आमदार आज सकाळी पक्षाच्या कार्यालयात एकत्र जमले आणि तिथून सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यावर अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि आज अंगारक योग असल्याने माझ्या पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांना घेऊन दर्शनाला आलो आहे. सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावा. लोकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा. शेवटी जनता-जनार्दन सर्वकाही असतात. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर जाणार आहोत.
निवडणूक तयारची अजित पवार गटाची 14 जुलैला पहिली सभा बारामतीमध्ये होणार आहे. या सभेत आम्ही विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काय निर्णय घेतले, कुठल्या योजना सुरू केल्या त्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. पुढील काळात वाटचाल करताना विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत, असेही अजित पवारांनी सांगितले. परवा अजित पवार विठ्ठलाच्या वारीतही सहभागी झाले होते.
खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, सगळ्या गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचे आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज दर्शन घेतले. आम्ही सिद्धिविनायकाच्या चरणी समर्पित होऊन उद्याच्या विधानसभा निवडणुकीचा श्रीगणेशा करत आहोत. राष्ट्रवादी पक्ष महायुतीतील पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे. आम्हाला सिद्धिविनायकाचे पूर्ण पाठबळ मिळेल, असा विश्वास आहे.
अजित पवार गटाच्या सिद्धिविनायक दर्शनावरून विरोधकांनी त्यांच्यावर टोलेबाजी केली. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ते सिद्धिविनायकाचे दर्शन घेत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. सिद्धिविनायकाला पाप-पुण्य समजते. पुण्य कोण करते आहे आणि पाप कोण करते आहे या सर्व गोष्टी समजतात. चोर्‍या, लबाड्या कोण करत आहे, कोण माझ्या दारात पुण्यात्मा व्हायला येत आहे हेदेखील सिद्धिविनायकाला कळते.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही अजित पवारांवर टीका केली. ते म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत अजितदादांना दगाफटका होईल. त्यामुळे दादा इमेज बिल्डिंगवर हल्ली जास्त खर्च करत आहेत. अरोरा नावाच्या व्यक्तीला याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. त्या अरोराने सांगितले असेल, मंदिरात जाऊन दर्शन घ्या. म्हणून मीडियाला सांगून भपका करत तुम्ही मंदिरात जाता. दादांनी कपडे कोणते घालायचे, भांग कसा पाडायचा, कसे बोलायचे हेही अरोरा ठरवणार आहे.
अजित पवारांची छबी
अरोरा सुधारणार

विधानसभा निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी अजित पवार गटाने खास रणनीती आखली असून, यासाठी इमेज बिल्डिंगची जबाबदारी प्रसिद्ध प्रचार व्यावस्थापक नरेश अरोरा यांच्याकडे सोपवली आहे. नरेश अरोरा हे डिझाइनबॉक्सडॉटकॉम या पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनीचे सहसंस्थापक आहेत. त्यांनी यापूर्वी राजस्थान आणि कर्नाटकसह अनेक राज्यांत काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन केले आहे. या कंपनीला 200 कोटींचे कंत्राट दिल्याचे सांगितले जात आहे. काल झालेल्या पक्षाच्या बैठकीत नरेश अरोरा यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पार्टीचे ब्रँडिंग आणि रणनीतीविषयी सादरीकरणही केले. राष्ट्रवादी पक्षाबरोबर नेते म्हणून अजित पवार यांचे ब्रँडिंग करण्याचे आणि मेकओव्हरवर करण्याचेही ठरवले आहे. त्यांची प्रशासनावरील पकड, शब्दांचे पक्के दादा, आश्वासनांची पूर्तता करणारे, दिलेला शब्द पाळणारे नेते, रोखठोक स्वभाव या सगळ्याचे ब्रँडिंग करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top