मुंबई- २००५ मध्ये नारायण राणे यांची सभा उधळल्याच्या प्रकरणात शिवसेना नेते आमदार अनिल परब, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, बाला नर यांच्यासह ४८ शिवसैनिकांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता झाली. घटना घडून १९ वर्षे उलटल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने हा निकाल देत शिवसैनिकांना मोठा दिलासा दिला. यात विद्यमान शिवसेना नेत्यांसह सध्या शिंदे गट आणि मनसेत गेलेल्या तत्कालीन शिवसैनिकांचा समावेश आहे. ही सुनावणी मुंबई सत्र न्यायाधीश आदिती कदम यांच्यासमोर पार पडली. त्यांनी ४८ शिवसैनिकांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात २०२२ पासून ३८ सुनावण्या झाल्या आहेत.
नारायण राणे यांची सभा उधळण्यासाठी आरोपी नागू सयाजी वाडीत येथे जात होते त्यावेळी पोलिसांनी अडवले असता आंदोलक शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. याप्रकरणी पोलिसांनी शिवसैनिकांविरुद्ध बेकायदेशीर जमाव करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत जमावबंदीच्या आदेशाचा भंग करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना इजा पोहोचवणे आदी आरोपांखाली दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.