मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला थंडीचा कडाका पुढील दोन ते तीन दिवस वाढणार असून नाशिक जिल्ह्याला थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या सर्वच भागात तापमानाचा पारा खाली उतरला आहे. उत्तर भारतातून येत असलेल्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात आजपासून पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा लाट राहणार आहे. नाशिक जिल्ह्यातील जेऊर या ठिकाणी सर्वात निचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अहिल्यानगर येथे साडेआठ अंश तापमान असून पुण्यातही पारा खाली गेला आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही कडाक्याची थंडी पडली आहे. हिंगोली जिल्ह्यात वाढलेल्या थंडीचा परिणाम सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत असून शाळेतील उपस्थितीही कमी झाली आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. राज्यातील अनेक शहरांमधील किमान तापमान ९ ते ११ अंश सेल्सिअस इतके खाली आले आहे.