पुणे: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आघाडीने मोठ्या प्रमाणावर जागा जिंकल्या. त्यानंतर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्या आहेत. २४ उमेदवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. त्याचबरोबर बारामतीत पराभूत झालेले शरद पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनीही बारामतीत फेर मतमोजणीची मागणी केली आहे .
पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार लढतीत अजित पवारांचा विक्रमी मतांनी विजय झाला,तर युगेंद्र पवारांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला. युगेंद्र पवारांसोबत पुणे जिल्ह्यातील आणखी १० उमेदवारांनी फेर पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारांमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक (शिरूर), प्रशांत जगताप (हडपरस), राहुल कलाटे (चिंचवड), सचिन दोडके(खडकवासला), अश्विनी कदम (पर्वती), अजित गव्हाणे (भोसरी) तर रमेश थोरात (दौंड) यांचा समावेश आहे. तर कॉंग्रेसचे रमेश बागवे (पुणे कॅन्टोन्मेंट), संजय जगताप व संग्राम थोपटे (भोर) यांचा समावेश आहे.
बारामती विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवारांनी गावोगावी जात मतदारांशी संपर्क करायला सुरवात केली आहे. काटेवाडी गावातून या आभार दौऱ्याला त्यांनी सुरुवात केली आहे. यावेळी ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील एकूण ११ उमेदवारांनी मतमोजणीच्या पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्हाला पाच टक्के ईव्हीएमची तपासणी करता येते, त्यानुसार आम्ही मतमोजणीच्या पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे. केवळ बारामतीतच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात संशयाचे वातावरण आहे, त्यामुळे आमचे कार्यकर्ते आणि लिगल टीमशी चर्चा केल्यानंतर आम्हाला वाटले की आपणही मतमोजणीची पडताळणी केली पाहिजे. बारामती मतदारसंघातील काही गावांत आम्हाला शंभर टक्के जास्त मते पडायला हवी होती. पण, तशी मते पडली नाही. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अधिकार दिलेला असेल तर पडताळणी करून घ्यायला हरकत नाही.