राजिंदर कौर भट्टल (पंजाब)
राजिंदर कौर भट्टल या पंजाबच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला मुख्यमंत्री. हरचरणसिंग ब्रार यांच्या राजीनाम्यानंतर भट्टल पंजाबच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. नोव्हेंबर 1996 ते फेब्रुवारी 1997 या काळात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले. मुख्यमंत्री असताना त्यांनी लहान शेतकर्यांसाठी वीजबिल माफीची योजना आणली होती. 2004 ते 2007 पर्यंत त्यांनी पंजाबच्या उपमुख्यमंत्री म्हणूनही
काम केले. त्याआधी 1994 मध्ये त्या राज्याच्या शिक्षण मंत्री होत्या. 1992 पासून त्या लेहरा विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झाल्या. अमरिंदर सिंग यांच्याशी त्यांचा वाद गाजला. अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवणार असल्याचे त्यांनी जाहीरपणे म्हटले होते. काँग्रेसमधील डझनभर असंतुष्ट आमदारांना आपल्या गोटात खेचण्यातही त्या यशस्वी झाल्या होत्या. अखेर सोनिया गांधी यांनी या वादात मध्यस्थी केली होती. सतलज-यमुना लिंक कालवा असंवैधानिकपणे संपुष्टात आणण्याच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ राजीनामा देणार्या त्या 42 काँग्रेस आमदारांपैकी एक होत्या.
राबडी देवी (बिहार)
राजकारणातही अनेकदा अतर्क्य, अविश्वसनीय घटना घडतात. त्यातून कुणी सत्तेबाहेर फेकले जातात तर कुणाचे नशीब रातोरात फळफळले. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राबडी देवी. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी या एका पात्रतेमुळे त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. तीही एक वेळा नव्हे तर तीन वेळा. जुलै 1997 मध्ये सीबीआयने चारा घोटाळा प्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री लालू प्रसाद यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर लालू प्रसाद यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि मुख्यमंत्रिपदासाठी पत्नी राबडी देवी यांचे नाव सुचवले. त्यांच्या या निर्णयावर देशभरातून टीका झाली. त्यांच्या 9 मुलांची खिल्ली उडवण्यात आली. तोपर्यंत स्वयंपाकघराच्या बाहेर न पडलेल्या राबडी अचानक बिहारच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या. 2000 मध्ये राजदने विधानसभा निवडणुकीत यश मिळवले. राबडी देवी पुन्हा मुख्यमंत्री बनल्या. बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यात तुरुंगात गेले, तेव्हा राबडी देवींकडे तिसर्यांदा बिहारची जबाबदारी आली. स्वतःला आणि मुलांना सांभाळत पक्षाला एकत्र ठेवण्याची मोठी जबाबदारीही त्यांच्यावर होती. ती त्यांनी यशस्वीरित्या पेलली. अधिकार्यांकडून सल्ले घेऊन त्यांना आपला राज्यकारभार यशस्वीरित्या चालवला. मात्र अंतिमतः राजकारणातील विधिनिषेध शून्यता आणि सत्तालोलूपतेचे त्या प्रतीक ठरल्या.
आनंदीबेन पटेल (गुजरात)
एकेकाळी काँग्रेसमध्ये हायकमांडचे पक्षावर इतके वर्चस्व असे की, त्यांच्या मर्जीतील कुणालाही मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळत असे. भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यावर भाजपानेही तोच खेळ सुरू केला. या खेळात आनंदीबेन पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्रिपद मिळाले. आपल्या विद्यार्थीदशेत आनंदीबेन चक्क अॅथलिट होत्या. त्यांना वीरबाला असा पुरस्कारही मिळाला होता. पुढे मोठेपणी त्या शिक्षिका बनल्या. राजकारणात त्यांचा प्रवेश हा शब्दशः अपघात होता. शाळेच्या सहलीदरम्यान बुडणार्या दोन मुलींना वाचवण्यासाठी त्यांनी जलाशयात उडी मारली. त्यासाठी त्यांना राष्ट्रपतींचा शौर्य पुरस्कार मिळाला. यांच्या शौर्याने प्रभावित होऊन, भाजपाच्या नेत्यांनी पटेल यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. सुरुवातीला, त्या पक्षात सामील होण्यास कचरत होत्या. परंतु केशुभाई पटेल आणि नरेंद्र मोदी यांचे मन वळवले. 1987 मध्ये त्यांनी गुजरात प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून भाजपामध्ये प्रवेश केला. पुढे आमदार, खासदार, राज्यात शिक्षणमंत्री अशी त्यांची राजकारणात चढती कमान राहिली. 22 मे 2014 ते 7 ऑगस्ट 2016 या काळात त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. त्यानंतर वयाची पंचाहत्तरी पूर्ण झाली, म्हणून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुढे छत्तीसगडच्या राज्यपालपदी त्यांची निवड झाली.