मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच फडणवीस व अदानींची भेट

मुंबई – मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन काही दिवस होत नाहीत तोच भारतातील सर्वात वादग्रस्त उद्योगपती गौतम अदानी यांनी आज सागर या शासकीय निवासस्थानी दुपारी 12 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दोघांत साधारणपणे दीड तास चर्चा झाली.
संसदेत मोदी अदानी भाई भाईच्या घोषणा देत काँग्रेस व मित्रपक्ष रोज अदानी समूहाच्या चौकशीची मागणी करीत आहे. या विषयावर रोज संसद तहकूब होत आहे. अदानी विरोधात वातावरण तप्त असतानाही त्याची पर्वा न करता आज फडणवीस व अदानी यांची भेट झाली.
देवेंद्र फडणवीस यांच्या
मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी कार्यक्रमाला गौतम अदानी उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे ही सदिच्छा भेट होती, असे सांगितले जात आहे. मात्र धारावी पुनर्विकास, वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ आदि सर्व मोठे प्रकल्प अदानी समूहाकडे असल्याने त्याबाबत चर्चेसाठी ही भेट होती, असे सांगितले जाते.
विधानसभा निवडणूक प्रचारात उबाठाने गौतम अदानी यांना धारावी प्रकल्प घेऊ देणार नाही, अशी गर्जना प्रत्येक सभेत केली होती.