मुंबई- मुंबईच्या डोंगरी येथील टणटण पुरा येथील एक शंभर वर्षे जुनी इमारत आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोसळली. ही इमारत रिकामी असल्याने काहीही हानी झाली नाही.
डोंगरी येथील नूर हॉस्टेल ही पाच मजली इमारत धोकादायक झाल्याने ती रिकामी करण्यात आली होती. काल रात्री साडेबारा वाजता इमारतीचा समोरचा भाग कोसळला . त्यानंतर आजुबाजूच्या लोकांनाही सतर्क करण्यात आले होते. अखेर आज पहाटे ती संपूर्णपणे कोसळली. त्यात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी अनेकांचे सामान ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात आले. १९१९ साली बांधण्यात आलेल्या या इमारतीत १८ रहिवाशी राहात होते तर तळमजल्यावर चार दुकाने होती. त्याच्या पुर्नविकासाबाबत वाद सुरु होता. ही इमारत कोसळल्यामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही तडे गेले आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून शेजारच्या चार इमारतींमधील रहिवाशांची घरेही रिकामी करण्यात आली.