मुंबई सेंट्रल एसटी आगाराचे सोमवारपासून काँक्रिटीकरण

  • १५५ गाड्यांचे स्थलांतर

मुंबई – एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील बसस्थानक परिसरात ३ डिसेंबरपासून सिमेंट कॉक्रीटीकरण केले जाणार आहे.या कामामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बसस्थानकातुन सुटणाऱ्या ‍ बाहेरील आगाराच्या बसच्या फेऱ्या या दिवसापासून टप्प्याटप्प्याने पुढील दोन महिन्यांसाठी मुंबईतील अन्य एसटी आगारातून सोडण्यात येणार आहेत. यात परळ, दादर व कुर्ला नेहरूनगर या बसस्थानकांचा समावेश असून १५५ बसफेर्‍या या स्थानकांतून सोडण्यात येणार आहेत.मुंबई सेंट्रल आगाराच्या गाड्या मात्र याच स्थानकातून सोडल्या जातील, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने एसटीच्या राज्यभरातील १८३ बसस्थानकांच्या परिसराचे काँक्रीटीकरण करण्याचे काम घेतले आहे. त्यासाठी सुमारे ६०० कोटी रुपये एमआयडीसी मार्फत खर्च केले जाणार आहेत. काही बसस्थानक परिसराचे काम सुरूही झाले आहे. मात्र, मुंबई सेंट्रल बसस्थानक परिसराचे काँक्रीटीकरण सोमवारपासून सुरू होणार आहे. सुमारे १९०० चौरस मीटर इतक्या परिसराचे पूर्ण काँक्रीटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १ कोटी ६४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.या कामामुळे बाहेरील आगारातून येणार्‍या गाड्यांच्या फेऱ्या जवळच्या परळ,दादर व कुर्ला नेहरूनगर बस स्थानकामध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहेत.हे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे या सर्व फेऱ्या मुंबई बसस्थानकातून सुरू होतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top