मुंबई
राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढचे ५ दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात १० जुलैपर्यंत जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत मध्यम तर छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता आहे. पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत तसेच नाशिक जिल्ह्यात आजपासून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.