बीड – विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा समाजाला पाडापाडी करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मराठा समाजाच्या हिताचा उमेदवार निवडून द्यावा. पण त्यांनी शक्यतो पाडापाडीच करा.
मनोज जरांगे यांनी सोमवार ४ नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची घोषणा केली होती.आज ते बीडच्या संवाद दौऱ्यावर होते. तिथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मराठा समाजाने विधानसभा निवडणुकीत शक्यतो पाडापाडी करावी, अशी सूचना केली. तसेच अर्ज मागे न घेणाऱ्या मराठा उमेदवारांनाही खडेबोल सुनावले. ते म्हणाले, माझ्या सूचनेनुसार अर्ज मागे न घेणाऱ्यांनी खरा पचका केला आहे. मी ज्यांनी अर्ज भरले त्यांना सांगितले होते की, अपक्ष अर्ज भरून मते खायचे काम करू नका. त्यामुळे ज्यांना पाडायचे आहे ते पडणार नाहीत. माझा पाठिंबा अपक्षाला आणि कुणालाच नाही. मला समाजाचे भविष्य बघायचे आहे. मूर्ख होऊन चालणार नाही.
ते पुढे म्हणाले की, राजकारण करायचे असते तर उमेदवार उभे केले असते. पण माझ्यासाठी माझा समाज मोठा आहे. या समाजाला मी मायबाप मानतो. समाज अडचणीत येऊ नये म्हणून मी योग्य पाऊल उचलत आहे. कुणाच्याही प्रचाराला आणि सभेलाही जाऊ नका, माझा निरोप आला तर बघू. नाही आला तर तुमचे असेल तिकडेच मतदान करायचे, पण शक्यतो पाडापाडी करा. मी दीडशे जणांना उभे केले असते. मात्र, त्यांच्यासाठी ६ कोटी समाजाचे वाटोळे करू शकत नाही. ते जर पडले असते तर समाजाला हिणवले गेले असते, टोमणे मिळाले असते. त्यामुळे माझ्या समाजाची मान खाली जाईल म्हणून मी माघार घेतली. समाजासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. या राजकारणासाठी आरक्षण जायला नको म्हणून मी ही भूमिका घेतली.