ठाणे – ज्या मतदान यंत्रात मतदान झाले, त्या मतदान यंत्रातील माहिती नष्ट करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर केला आहे.
मतदान यंत्रात घोटाळा झाल्याचा आरोप सध्या विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. आज जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मतदान प्रक्रियेत काही बिघाड नव्हता हे दाखवण्यासाठी, निवडणूक आयोगाकडून दुसरी यंत्रे दाखवण्यात येतील. असे असेल तर फेरमतमोजणीचा काय उपयोग ? ज्या मतदान यंत्रात मतदान झाले, त्यातील मतदानाची माहिती नष्ट केली आहे. निवडणूक विभागाकडे पाच वर्षांत पाच लाख मतदार वाढले असताना, सहा महिन्यात ४६ लाख मतदार कसे वाढले? २०१९ ते २०२४ या कालावधीत पाच लाख नवीन मतदार नोंदणी झाली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत ४६ लाख मतदान वाढले. निवडणूक विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. जुन्याच यंत्रणा आहेत. मतदार यादी योग्य नसते. त्यातील दुबार मतदारांबाबत तक्रारी करूनही ती वगळली जात नाहीत. यंत्रामध्ये झालेल्या मतदानाची आकडेवारी दिसून येते. पक्षाच्या प्रतिनिधींसमोर ही यंत्र बंद केली जातात.निवडणूक विभागाने या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी. कारण, तो आमचा अधिकार आहे.असेच सुरू राहीले तर लोकशाही नावाचा देश होता, हे इतिहासात लिहिण्याची वेळ येईल.