इंफाळ – मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काकचिंगमध्ये दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या झाली. दोन्ही मजूर बिहारच्या गोपालगंज येथील रहिवासी होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मजूर ककचिंग जिल्ह्यातील केरक येथे बांधकामावरून परत येत होते. त्यावेळी पंचायत कार्यालयाजवळ सुनालाल कुमार (१८) दशरथ कुमार (१७) या दोघांवर गोळीबार झाला. घटनेनंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, दोघांनाही स्थानिक जीवन रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोघेही यादवपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोपालगंज जिल्ह्यातील राजवाही गावचे रहिवासी होते.याप्रकरणी, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मणिपूरमध्ये १९ महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी गेला असून, हजारो कुटुंबे घर सोडून मदत छावण्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. मणिपूर दिवसेंदिवस अशांतता निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत.