नागपूर- मंत्रीपद न मिळाल्याने भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार हे नागपुरात असूनही आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात गैरहजर राहिले. आपण नाराज आहोत हे त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले नसले तरी त्यांच्या वक्तव्यातून ते प्रचंड नाराज असल्याचे स्पष्ट होते . मला मंत्रिपद मिळणार असे सांगितले होते . त्यानंतर मला दूर सारण्यात आले आहे हे दोघा नेत्यांनी मला सांगितलेही नाही असे ते म्हणाले. मुनगंटीवार दुपारी नितीन गडकरी यांच्या घरी गेले आणि त्यांच्याशी दोन तास चर्चा केली.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मी पक्षावर नाराज कधीच असू शकत नाही. आज विधानसभेत कामकाज नव्हते, त्यामुळे गेलेलो नव्हतो. कारण नसताना अनेकजण अनेक प्रश्न विचारतील त्यामुळे गेलो नाही. मागच्या वेळी खाती देताना सांस्कृतिक वगैरे खाती दिली. त्यातही मी जीव लावून काम केले. आताही जीव लावून काम करणार आणि संघटनेसोबत राहणार आहे. मला मंत्रिपद देणार, असे सांगितले होते. त्यानंतर मला मंत्रिपद देणार नाही, असे सांगितले नाही. मी नवीन जबाबदारीची वाट पाहात आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझे सातत्याने बोलणे व्हायचे. मात्र त्यांनी कधी हे जाणवू दिले नाही. दोन्ही नेत्यांनी नाव पुढे पाठवले आहे, असेच मला सांगितले होते. परंतु माझे नाव नव्हते. मी रात्रीपासून त्यावर विचार करत आहे की नेमके काय झाले. हे मला अद्याप कळलेले नाही. मला का डावलले याचे कारण कळले तर मी निदान त्यावर सुधारणा करीन . पण मला काहीच सांगितले नाही . मंत्री असतो तर मी सभागृहात आलो असतो. परंतु आज माझे काम नव्हते, त्यामुळे मी आलेलो नव्हतो. जेव्हा मला प्रश्न मांडायचे आहेत, तेव्हा मी नक्कीच येणार आहे. लोकसभेला उभा राहिलो. नंतर विधानसभेत मोठा विजय झाला. तरीही मला का डावलले, हे मला माहिती नाही. मी संघटनेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे, खचून जाणारा कार्यकर्ता नाही.
दरम्यान, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या पक्षातून दोनच दिवसांपूर्वी भाजपत आलेले किशोर जोरगेवार यांना उमेदवारी देण्यावरून भाजपामध्ये मोठा वाद झाला होता. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधात कधीही उघड भूमिका न घेणारे सुधीर मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांच्या उमेदवारीला उघड विरोध करीत निवडीवर अंतिम निर्णय घेणारे केंद्रिय नेतृत्व अमित शहा यांनाच सवाल केला होता की, तुम्ही बाहेरून चार पक्ष फिरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी कशी देता? निष्ठावंत कार्यकर्ता काम कसे करणार? त्यानंतर जोरगेवार यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी करण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. मात्र दिल्लीवरून परत आल्यानंतर त्यांनी स्वतः किशोर जोरगेवार यांचे स्वागत केले होते. दरम्यान मुनगंटीवार यांना पक्षात मोठे स्थान देऊ असे फडणवीस म्हणाले.