मंगेशकर रुग्णालयाविरूध्द संताप उसळला10 लाखांसाठी निष्पाप मातेचा जीव गेला

पुणे – शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डिपॉझिटच्या पैशांसाठी अडवणूक करून गंभीर प्रकृती असलेल्या 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर उपचार न केल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आप्तांनी केला. ही महिला भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांची पत्नी होती. आमदाराचा फोन आला तरी रुग्णालयांनी दाद दिली नाही आणि एका निष्पाप मातेचा मृत्यू झाला. यामुळे रुग्णालयाबद्दल प्रचंड संताप उसळलेला आहे
मयत तनिषा भिसे हिच्या नातेवाईकांनी समाज माध्यमांसमोर येऊन आपली व्यथा मांडली. त्यांच्यावर ओढावलेल्या संकटाची माहिती मिळाल्यानंतर संताप उफाळून आला. रुग्णालयाच्या विरोधात भावना भडकल्या. त्यानंतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
रुग्णालयाबाहेर आंदोलने केली. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बाहेर येऊन आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिंदे गटाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर नाणी उधळली. त्यामुळे ते परत गेले. त्यानंतर रुग्णालयाच्या प्रचार प्रमुखाने बाहेर येऊन सांगितले की, रुग्णालय याबाबतचा अहवाल सरकारला सादर करणार आहे. मात्र लोकांचा संताप कमी झाला नाही. रुग्णालयाबाहेर एकामागेएक आंदोलक येत होते. भाजपा कार्यकर्त्यांनी तर चुकीने रुग्णालयातील डॉक्टरच्या भावाच्या खासगी दवाखान्यात जाऊन तोडफोड केली. या एकूण परिस्थितीनंतर रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मयत तनिषा यांचे पती सुशांत भिसे यांची बहीण प्रियांका पाटील यांनी या घटनेची माहिती देताना म्हटले की, आम्ही सकाळी 9 वाजताच्या सुमारास मंगेशकर रुग्णालयात गेलो. तेथे डॉक्टर घैसास यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर बीपी वाढल्याचे सांगितले. त्यांनी वहिनीला नव्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर हलविण्यास सांगितले. तेथे असेसमेंट रुममध्ये दुसरे डॉक्टर आले. त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव करून दिली. सिझर करावे लागेल. त्यामुळे काही खाऊ-पिऊ नका, असे सांगितले. सिझरची तयारीही त्यांनी केली, रुग्णाचे कपडे घालायला दिले. त्यानंतर डॉक्टर घैसास आले, त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले. याशिवाय रक्तस्राव होत असल्यामुळे लगेचच शस्त्रक्रिया करावी लागेल. सातव्या महिन्यात प्रसूती होत असल्यामुळे बाळांना एनआयसीयुमध्ये ठेवावे लागेल. दोन्ही बाळांचा प्रत्येकी दहा लाख असा वीस लाखांचा खर्च होईल, असे सविस्तर सांगितले. परंतु आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी दहा लाख तत्काळ भरण्यास सांगितले. पैसे भरणे शक्य नसल्यास तुम्ही ससूनला जाऊन उपचार घेऊ शकता, असेही ते म्हणाले. हे सर्व वहिनी तनिषा भिसे यांच्यासमोरच सांगितल्यामुळे तिच्या मनावर दबाव आला. आधीच रक्तस्राव, उच्च रक्तदाब असल्यामुळे स्थिती नाजूक होती, त्यात खर्चाचा आकडा ऐकून ती अक्षरशः कोसळली. वहिनी तिथेच रडायला लागली. आम्ही पैशांची व्यवस्था करतो. रुग्णाच्या मनाला समाधान मिळेल यासाठी तरी उपचार सुरू करा, अशी आम्ही वारंवार विनंती करत होतो. पण रुग्णालयाने रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. आधीच्या रुग्णालयातून मिळालेली गोळीच खा, असे उत्तर दिले. त्यानंतर त्यावर आमच्याकडे सध्या 2 ते 3 लाख असून आम्ही इतर पैशांची जुळवाजुळव करू, पण आपण उपचार करावे, अशी विनंती केली. पण मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपये भरेपर्यंत उपचार करण्यास नकार दिला. त्याच दरम्यान तनिषा यांची प्रकृती अधिकच खालवली. दरम्यान, त्यांचे जावई अक्षय पाटे हे धावत 3 लाख रुपये घेऊन आले आणि हे पैसे घ्या व उपचार सुरू करा, असे आम्ही सांगितले. परंतु 10 लाख रुपये भरेपर्यंत उपचार सुरू करण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर सुशांत भिसे यांनी पत्नीला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण यामध्ये जवळपास तीन तासांचा कालावधी गेला.
सुशांत यांनी सांगितले की, काही मंत्री, आमदार यांनीही रुग्णालय प्रशासनाला फोन केले. परंतु त्यांनी कोणाचे ऐकले नाही. प्रसूती वेदना वाढल्याने नाईलाजाने रुग्णाला वाकड येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. मात्र तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. शेवटी खासगी गाडीनेच त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेले. सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांची सिझेरियनद्वारे प्रसूती झाली. तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, त्यांना हृदयाचा त्रास असल्याचे वाटल्याने सूर्या रुग्णालयाने त्यांना जवळच्या मणिपाल रुग्णालयात नेण्यास सांगितले. तनिषा यांना तिथे दाखल केले. तोपर्यंत उशीर झाला होता. योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तनिषा यांच्या मृत्यूला दीनानाथ रुग्णालय प्रशासन जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
रुग्णालय प्रशासनातील रवि पालेकर यांनी सांगितले की, या प्रकरणी चौकशी सुरू असून, शासनाला अहवाल देण्यात येणार आहे. जिल्हा मेडिकल बोर्डचे अध्यक्ष एकनाथ पवार हे ससून रुग्णालयाचे डीन आहेत. परंतु नुकतीच त्यांच्यावर ईडीची कारवाई झाल्याने ते स्वतः चौकशीच्या फेऱ्यात आहेत. त्यामुळे याप्रकरणी नेमलेल्या समितीची कार्यवाही कोण करणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या रुग्णालयाला राज्य शासनाने 18 फेब्रुवारी 2025 च्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार वार्षिक 1 रुपया भाडेतत्वावर 795 चौ.मी. जमीन दिली आहे. या धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयाला सरकारकडून एवढी मदत होत असताना रुग्णांची लूट करण्याचा प्रकार सुरू असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सांगितले.
या घटनेमुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी, सत्ताधारी व विरोधक यांनी आक्रमक भूमिका घेतली. राज्य शासनाने या घटनेची दखल घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. ज्या प्रकारे तेथील डॉक्टरांनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेने त्या महिलेला भरती करून घेण्यास नकार दिला, अधिकचे पैसे मागितले. यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झाली आहे. या संदर्भात मी एक कमिटी स्थापन केली असून, ती कमिटी या घटनेचा तपास करणार आहे. याशिवाय अशा घटना होऊ नये म्हणून रुग्णालयांवर कशा प्रकारे नियंत्रण आणता येईल याकडे लक्ष देण्यात येईल. पैशांची चिंता न करता त्या महिलेला भरती करून घेणे आणि नैतिकतेचे पालन गरजेचे होते. मुख्यमंत्री कक्षातून या प्रकरणात लक्ष घातले होते. परंतु रुग्णालयाने योग्य प्रतिसाद दिला नाही. अशा प्रकारच्या घटना यापुढे होऊ नये म्हणून कडक कारवाई करण्याचा आमचा मानस आहे. पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या भगिनीच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली आहे. आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने त्यांचे म्हणणे मांडले असले तरी संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या असून, चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, मंगेशकर रुग्णालयात ज्या पद्धतीने एका रुग्णाला अधिकचे पैसे भरले नाहीत म्हणून उपचाराला जो उशीर झाला आणि त्यामुळे मन सुन्न करणारी घटना पुण्यात घडली. या संपूर्ण घटनेची पुण्याचे आरोग्य उपसंचालक आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीला चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशी समितीच्या माध्यमातून रुग्णालयाचे आणि त्या कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानुसार सादर अहवालानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालय प्रशासनावर टीका केली.
ठाकरे गटाने मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. खा. संजय राऊत म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेला. तरीही भिसेंच्या कुटुंबावर संकट कोसळले. त्या मातेचा करूण अंत झाला. काय करत आहेत देवेंद्र फडणवीस? सरकारला 100 दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत आहेत. मला वाटते की, गोरगरिबांची कामे फडणवीसांच्या लेव्हलची नाही. त्यांची लेव्हल खूप मोठी आहे. शेतकरी आणि गरीब मंडळी तडफडून मरत आहेत. योजना कागदावर आहेत, एकनाथ शिंदे, अजित पवार हे तोंडाला पोपट बांधून फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची झेप अदाणी, अंबानी, टाटा, बिर्ला यांच्या मोठ्या कामांची आहे. त्यांना त्यांच्या लेव्हलची कामे सांगितली पाहिजे. त्यांच्या पक्षाला आणि मुख्यमंत्र्यांना गोरगरिबांची काम करायची सवय नाही. भाजपाचे कार्यकर्ते तडफडून मरत आहेत. आरोग्यसेवेचे धिंडवडे निघाले आहेत. मंत्रालयात बसून दम देणे सोपे असते.
शिंदे गटाने दीनानाथ रुग्णालयाबाहेर केलेल्या आंदोलनात त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनाला या घटनेसंदर्भात कारवाई करण्याचे निवेदन दिले. तर प्रशासनाने याप्रकरणी कोणतेही स्पष्टीकरण न दिल्यामुळे त्यांच्यावर नाणी फेकून संताप व्यक्त केला. काँग्रेस व भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनीही रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. याशिवाय पतित पावन संघटनेने रुग्णालयाच्या बोर्डाला काळे फासून निषेध व्यक्त केला. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला. त्यांनी डॉ. सुश्रुत घैसास यांचा भाऊ चैतन्य घैसास यांचे कोथरूड परिसरातील एरंडवणा येथील अश्विनी नर्सिंग होम या खासगी क्लिनिकची तोडफोड केली.

महिलेचा आक्रोश
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर आज संतप्त नागरिकांनी आंदोलन केले. यावेळी एक महिला म्हणाली की, मी पण माझी एक 29 वर्षांची मुलगी मुंबईमध्ये गमावली. सर्व केले, आंदोलन केले, तक्रारी केल्या, पण काही झाले नाही. मी आज माझ्या मुलीचे लहान मूल सांभाळत आहे. मला माहिती आहे काय वेदना होतात. लक्षात घ्या, ही अंदाधुंदी बंद करा आणि गरिबांचे वाली व्हा.

रुग्णालयाचे स्पष्टीकरण
याप्रकरणी मंगेशकर रुग्णालयाने संचालक डॉ. धनंजय केळकर, डॉ. अनुजा जोशी, डॉ. समीर जोग आणि डॉ. सचिन व्यवहारे या चार तज्ज्ञांची चौकशी समिती नेमली होती. त्यांनी या समितीचा अहवाल सादर केला. रुग्णालयाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार भिसे या 2022 पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार घेत होत्या. 2022 मध्ये सदर महिलेवर 50 टक्के चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाली आहे. 2023 मध्ये रुग्णाला रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भार्पण व प्रसूती शक्यता नसल्याने मुल दत्तक घेण्याविषयी सल्ला दिला होता. आई व बाळाच्या सुरक्षेसाठी प्रसूतिपूर्व तपासणी कमीत कमी 3 वेळा करून घेण्याचा सर्व रुग्णालयांचा संकेत असतो. तो त्यांनी या रुग्णालयात केला नाही व त्याची या रुग्णालयास माहिती नाही. 15 मार्चला इंदिरा आयव्हीएफचे रिपोर्ट घेऊन त्या डॉ. घैसास यांना भेटल्या. अतिशय जोखमीचे व धोकादायक प्रसूतीबद्दल डॉ. घैसास यांनी त्यांना माहिती दिली होती. शुक्रवार 28 मार्चला सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास सदर रुग्ण पती व नातेवाईक डॉ. घैसास यांच्या बाह्यरुग्ण विभागात आले होते. ते इमर्जन्सीमध्ये आले नव्हते याची कृपया नोंद घ्यावी. डॉ. घैसास यांनी रुग्णाची तपासणी केली. तपासणीनंतर असे दिसून आले की, रुग्ण पूर्ण बरी होती व कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेऊन निरीक्षणासाठी भरती होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्याचसोबत प्रसूती व सिझेरियन संबंधित धोक्याची माहिती दिली. कमी वजनांची 7 महिन्यांची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी दोन ते अडीच महिन्याचे एनआयसीयु उपचार लागतील हे समजावून सांगितले व रुपये 10 ते 20 लाख एकूण खर्च येऊ शकतो याची कल्पना दिली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या व मी प्रयत्न करतो असे सांगितले. रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला व आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा (नातेवाईकांप्रमाणे रुपये 2 ते 2.5 लाख), म्हणजे मी डॉक्टर घैसास यांना सांगतो, असे सांगितले. रुग्णाचा कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंट येथे प्रत्यक्ष भेटला नाही, याची कृपया नोंद घ्यावी. जेव्हा डॉक्टर केळकर यांचे ऑपरेशन संपले व त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला तेव्हा त्यांनी रुग्ण न सांगता निघून गेल्याचे कळवले. त्यामुळे 28 मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती. यानंतर इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या बातमीनंतर सर्वांना रुग्णाचा सिझेरियनमध्ये झालेल्या गुंतागुंतीमुळे मृत्यू झाल्याचे कळले. सदर वृत्तपत्रातील माहितीप्रमाणे, 28 मार्चला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास सूर्या हॉस्पिटल वाकड येथे भरती झाली. 29 मार्चला सकाळी सिझेरियन झाले. दीनानाथमधून सदर रुग्ण ससून व तिथून सूर्या हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीने गेला व सिझेरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झाले ह्याची नोंद घ्यावी. सूर्या हॉस्पिटलमधील माहितीनुसार आधीच्या ऑपरेशनची व कॅन्सर संबंधीची तिच्या नातेवाईकांनी माहिती लपवून ठेवली असे समजते.
सदर चौकशीअंती व रुग्णालयातील इतर सीनियर स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मतानुसार आमच्या समितीचा निष्कर्ष निघाला की, सदर रुग्णासाठी जुळी प्रसूती धोकादायक होती. माहितीचे रुग्णालय असून, सुद्धा एएनसी चेकअपसाठी पहिले सहा महिने रुग्णालयात आल्या नाहीत. अनामत रक्कम मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केलेली दिसते. रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाहीत तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला त्यांनी पाळला नाही. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा व अनामत रक्कम मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार केल्याचे समितीचे मत आहे. रुग्णालयाने हे स्पष्टीकरण दिले असले तरी रुग्णालयाने 10 लाख रुपये भरण्यास का सांगितले? या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. त्याचबरोबर डॉ. केळकर यांनी जेवढे पैसे नातेवाईकांकडे आहेत तेवढे स्वीकारा, असा फोन अकाऊंटंटला ताबडतोब का केला नाही? रुग्ण दारात आला असताना त्याच्यावर त्वरीत उपचार का सुरू केला नाही? रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात का जावे लागले? या सर्व प्रश्नांची उत्तरे दीनानाथ रुग्णालयाला द्यावीच लागतील.