भिवंडी – ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार रुपेश म्हात्रे यांनी माघार न घेण्याचा निर्धार समर्थकांच्या शक्तिप्रदर्शन सभेत व्यक्त केला. भिवंडी पूर्वमध्ये महाविकास आघाडीकडून समाजवादी पार्टीचे रईस शेख यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते नाराज झाले आहेत.
यावेळी ठाकरे गटाचे शहर जिल्हा प्रमुख मनोज गगे, तालुका प्रमुख कुंदन पाटील, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे, शरद गटाचे तालुकाध्यक्ष गणेश गुळवी, महेंद्र पाटलांसह ठाकरे गट, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुपेश म्हात्रे यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते. रुपेश म्हात्रे यांना सांगितले की, २०१९ मध्ये कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना खासदार बनवण्यासाठी भिवंडीत आम्हाला कपिल पाटील यांचे काम करण्यास भाग पाडले होते, तर नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची ताकद मोठी असतानासुद्धा ४ पक्ष फिरून आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी आम्हाला काम करावे लागले. प्रत्येक वेळेस आमचा बळी का म्हणून द्यायचा. वरळीत उध्दव ठाकरे यांच्या मुलाला फायदा होईल म्हणून भिवंडीत समाजवादी पक्षाला ठाकरे गटाने समर्थन देऊन आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला असून आम्ही हा अन्याय कदापी सहन करणार नाही. या निवडणुकीच्या मैदानात लढणार आहे.