नवी दिल्ली – आर्थिक व्यवहारासाठी व छायाचित्र असलेले सरकारी ओळखपत्र व अत्यावश्यक कागदपत्रांपैकी एक असलेले पॅन कार्ड आता अधिक अद्ययावत होणार आहे. यापुढे नागरिकांना नवे क्यू आर कोड असलेले पॅनकार्ड घ्यावे लागणार आहे. पॅनकार्ड अद्ययावत करण्याच्या पॅन २ या प्रकल्पाला काल केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
या प्रकल्पानुसार ज्यांच्याकडे सध्या जुने कार्ड आहे, त्यांना क्यूआर कोड असलेले नवे पॅनकार्ड मिळणार आहे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल संसदेत या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, यासाठी पॅन क्रमांक बदलण्याची गरज नाही. सध्याचा क्रमांकच नव्या कार्डवर येईल. या प्रकल्पासाठी १४३५ कोटी रुपये खर्च येणार आहे. नव्या पॅनकार्डासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. या नव्या कार्डामध्ये क्यूआर कोड दिला जाणार असून याद्वारे पॅनकार्ड अधिक सक्षम केले जाणार आहे. पॅन कार्ड अपग्रेड करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नसल्याचेही वैष्णव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, पॅनकार्ड ऑपरेट करणारे सॉफ्टवेअर १५ ते २० वर्षे जुने असल्याने यात अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. नव्या प्रणालीअंतर्गत पॅनकार्डशी संबंधित सर्व यंत्रणा डिजिटल पद्धतीने तयार करण्यात येणार आहेत, जेणेकरून तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यात येईल. देशात आतापर्यंत ७८ कोटी पॅनकार्ड वितरित करण्यात आली आहेत. नव्या प्रणालीनुसार कोअर व नॉन-कोअर पॅन/टॅन कामकाज आणि पॅन व्हेरिफिकेशन यंत्रणेचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. नव्या पॅनकार्डामुळे तक्रार निवारण यंत्रणा अद्ययावत होणार आहे. या सोबतच करदात्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पॅन डेटा व्हॉल्ट सिस्टम तयार करण्यात येत आहे. हे स्वयंचलित विशेष पोर्टल असल्याने इतर पोर्टलवर जाण्याची गरज भासणार नाही.