भंडारा गोंदिया जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे शाळांना सुटी

भंडारा – पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पूरस्थिती आजही कायम राहिल्याने या जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना आज सुटी देण्यात आली. भंडाऱ्यात वैनगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे गोसेखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व म्हणजे ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. आज दुपारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी पूरस्थिती कायम आहे. या चारही जिल्ह्यातील सर्वच नद्या व नाल्यांना पूर आले आहेत. अनेक सखल भागातील पाणी ओसरले असले तरी काही भाग अद्यापही पाण्याखाली आहेत. वैनगंगा धरणाचे ३३ पैकी २५ दरवाजे काल उघडण्यात आले होते. आज सर्वच दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगेला पूर आला . याचा फटका नदीकाठच्या गावांना बसला असून अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वाघ नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. चंद्रपूरातही आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला. जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.