बेस्टच्या कंत्राटी बसने आणखी एकाचा बळी घेतला! आठवडाभरातील तिसरा अपघात

मुंबई – कुर्ला येथे एका बेस्ट चालकाने अनेक वाहनांना धडक देऊन ७ जणांचा बळी घेतल्यानंतर काल मध्यरात्री पुन्हा एकदा बेस्टच्या कंत्राटी बसने दुचाकीस्वाराला चिरडले. या अपघातात २५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. संतापजनक बाब म्हणजे बेस्ट बसमुळे घडलेला आठवडाभरातील तिसरा अपघात आहे.
काल रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास शिवाजी नगर जंक्शनवर हा अपघात झाला. विनोद दीक्षित असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. शिवाजीनगर जंक्शनवर हायवे बस थांब्याजवळ बसच्या उजव्या बाजुच्या मागच्या टायरखाली विनोद चिरडला गेला. बीव्हीजी गृप या कंपनीची ही कंत्राटी बस होती. विनोद आबाजी रणखांबे असे चालकाचे नाव आहे.
अपघात घडल्याचे समजतात आसपासचे रहिवासी मोठ्या संख्येने अपघातस्थळी जमा झाले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या विनोद दीक्षित याला तातडीने राजावाडी रुग्णालयात हलवले. मात्र तिथे दाखल करून घेण्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बेस्टच्या बसने घडलेला हा एका आठवड्यातील तिसरा अपघात आहे. याआधी ९ डिसेंबर रोजी कुर्ला येथे बेस्ट बसने ७ जणांचा बळी घेतला. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बेस्टच्या बसने एका ५५ वर्षीय दुचाकीस्वाराला चिरडले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top