वॉशिंग्टन – फेसबुकचा (आताचे मेटा) संस्थापक मार्क झुकरबर्ग अडचणीत आला आहे. अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने (एफटीसी)त्याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. झुकरबर्गने इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसची केलेली खरेदी बेकायदेशीर आहे,असा एफटीसीचा दावा आहे. एफटीसीने झुकरबर्गविरोधात दावा दाखल केला आहे. या खटल्यात जर निकाल विरोधात गेला तर झुकरबर्गला सक्तीने इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅप विकावे लागणार आहे.
सोशल मीडिया क्षेत्रात आपल्याला वरचढ ठरणाऱ्या कंपन्यांशी थेट स्पर्धा करता न आल्याने झुकरबर्ग याने बेकायदेशीर मार्गांनी इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅप खरेदी केली असा एफटीसीचा आरोप आहे. झुकरबर्गने ही खेळी सोशल मीडिया क्षेत्रात आपली मक्तेदारी निर्माण करण्यासाठी केली. त्यामुळे ग्राहकांना उपलब्ध असलेले स्वतंत्र पर्याय त्याने संपुष्टात आणले,असा आरोप एफटीसीने ठेवला आहे.
एफटीसीने दाखल केलेल्या या खटल्यामुळे झुकरबर्ग यांची धाबी दणाणली आहेत.झुकरबर्गला अमेरिकेत जाहिरातींच्या माध्यमातून मिळणारे पन्नास टक्के उत्पन्न इन्स्टाग्रामपासून होते. याचा विचार केल्यास इन्स्टाग्राम हातून जाणे झुकरबर्गला परवडणारे नाही. त्यासाठी तो सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळीक साधून त्यांना याप्रकरणी मध्यस्थी करण्याची गळ घालत आहे,असे बोलले जाते.
