नाशिक – मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज आपले कार्यकर्ते व समर्थकांची नाशिकमध्ये बैठक घेतली. उद्याही त्यांची बैठक आहे. त्यानंतर ते निर्णय घेणार आहेत. मात्र ते वेगळा काही निर्णय घेण्याचे संकेत देत आहेत.
आजच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त करत आपल्या पक्षाच्या प्रमुखांवर त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, माझा मंत्रिमंडळात समावेश व्हावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी आग्रही होते. तरीही मला मंत्रिपद कोणी नाकारले याचा शोध घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे निर्णय तिघे नेते घेतात, ते कुणाला काही सांगत नाहीत. शरद पवार मात्र निर्णय घेताना विश्वासात घ्यायचे.
नाशिकमधील भुजबळ फार्म येथे कार्यकर्ते व समर्थकांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी आग्रही होते. परंतु, मला मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे माझे मंत्रिपद कोणी नाकारले ते मला शोधावे लागेल. तेच शोधण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. महायुतीत मंत्रिपद कोणाला द्यायचे हा निर्णय पक्षांच्या प्रमुखांचा असतो. भाजपामध्ये तो निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात. शिवसेनेबाबतचे सगळे निर्णय एकनाथ शिंदे घेतात. आमच्या पार्टीचे निर्णय अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघे घेतात. ते कुणाला काही सांगत नाहीत. सर्वांनाच मंत्रिपद हवे असते. परंतु प्रश्न मंत्रिपदाचा नाही. ज्या प्रकारे माझी अवहेलना झाली तो विषय आहे त्या संदर्भात राज्यभरातील कार्यकर्ते, समर्थक, समता परिषदेतील कार्यकर्ते यांची उद्या नाशिकमध्ये बैठक घेणार आहे. त्यांची भूमिका ऐकून मी निर्णय घेणार आहे. मला मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात राग आहे. मात्र तुम्हाला जो काही निषेध नोंदवायचा आहे तो शांतपणे करा. सर्वांच्या मनात निराशा आहे. मोबाईलवर किंवा प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त होताना असंस्कृतपणे बोलू नका. शिवीगाळ करू नका, ‘चप्पल मारो’सारखे आंदोलन करू नका. लोकशाहीत मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र शब्द जपून वापरा. आता त्यांना नवे चेहरे आणायचे आहेत. ओबीसीचे नवे नेतृत्व तयार करायचे आहे. पण त्यांनी गेले वर्षभर ओबीसीचे काय काम केले ते बघा. मी आता माझ्या मतदारसंघासाठी काम करणार आहे, असे आवाहन कार्यकर्ते व हितचिंतकांना केले आहे.
दरम्यान, बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी निवासस्थानाबाहेर ओबीसी समाजाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. अजित पवारांनी छगन भुजबळ यांचे मंत्रिपद नाकारले. त्यामुळे आम्ही अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन करीत आहोत. तसेच अजित पवारांनी लवकर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अन्यथा बारामतीत उद्रेक करू. असा इशारा आंदोलकांनी दिला.
तर नाशिकमधील अंबड येथे सकल ओबीसी समाजाच्यावतीने महात्मा फुले चौकात आज सकाळी धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला.
भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानेही प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, भुजबळांबद्दल मला फार वाईट वाटले. अनेकजण तिथे अपेक्षेने गेले होते. त्या सर्वांबद्दल मला सहानुभूती आहे. सरकारची झाली दैना, त्यामुळे तिथे चैना नाही. त्यामुळे वहाँ नही रहेना हे त्याचे म्हणणे योग्य आहे. दरम्यान, भुजबळांनी अद्याप संपर्क केलेला नाही. मात्र अधूनमधून ते माझ्या संपर्कात असतात.
तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भुजबळ यांची नाराजी रास्त आहे. एखाद्या माणसाला वापरून फेकून देणे बरोबर नाही. शरद पवार यांच्यासोबत आल्यापासून त्यांनी भुजबळ यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले. त्यांनी कुठे राहावे, कुठे जावे हा माझा प्रश्न नाही, त्यांचा प्रश्न आहे. मात्र एका लढवय्या कार्यकर्त्यांची राजकीय कारकीर्द कापण्याची पद्धत चुकीची आहे.