पैठणच्या नाथसागर धरणावर ६ ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे टेहळणी

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील नाथसागर धरणाच्या प्रतिबंधक क्षेत्रातील भागामध्ये काल रात्रीच्या सुमारास अचानक ६ ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे टेहाळणी केल्याचे तेथील सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आले. याची माहिती तात्काळ धरण उप अभियंता विजय काकडे यांनी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी धरण परिसरात धाव घेतली. मात्र तोपर्यंत हे कॅमेरे धरण परिसरातून बाहेर निघून गेले होते. या प्रकारामुळे धरणाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काल रात्री धरण नियंत्रण कक्षात पाण्याची नोंद घेण्यासाठी कर्तव्यावर असलेले पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व सुरक्षारक्षकांना अचानक धरण परिसरात अज्ञात ड्रोन कॅमेरे घिरट्या मारीत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात विजय काकडे यांनी वरिष्ठ कार्यकारी अभियंत्यांना माहिती दिली. पैठण पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षकांनी आपल्या पथकासह धरणावर जाऊन पाहणी केली. परंतु हे कॅमेरे धरण परिसराच्या बाहेर गेले होते. या प्रकरणी आज पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव व विजय काकडे यांनी पैठण पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top