तासगाव – सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात सिंचन योजना बंद असल्यामुळे पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. बंधारे रिकामे असून कूपनलिकांनाही पाणी कमी झाले आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे ऊस व द्राक्ष हंगाम संकटात सापडला आहे.त्यामुळे सिंचन योजना सुरू करून तत्काळ पाणी देण्याची मागणी होत आहे.
गेल्या महिन्यापासूनच तालुक्यात शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवू लागली.मांजर्डे,पेड,आरवडे,मोराळे, बलगवडे,बस्तवडे, गौरगाव,वायफळे, सावळज आदी परिसरात शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.टेंभू,आरफळ, विसापूर-पुणदी या सिंचन योजनांच्या रब्बी आवर्तनाचे प्रशासनाकडून योग्य नियोजन झाले नसल्यामुळे सर्व लाभक्षेत्रात पाणी देणे शक्य झाले नाही. त्यामुळेच पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. रब्बी हंगामाच्या काळात पाणी योजनांच्या माध्यमातून सर्व लाभक्षेत्रात पाणी दिले असते,तर त्याचा फायदा शेतीला झाला असता. पाटबंधारे विभागाने अल्प काळातच आवर्तन बंद केले. याचा फटका शेतीला बसला आहे.