३ हजार कोटी खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी !
मुंबई- मुंबई महापालिकेच्या सायन म्हणजेच शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचा कायापालट होणार आहे.या रुग्णालयांच्या पुनर्विकासात रुग्णांसाठी नव्या सोयी निर्माण केल्या जाणार आहेत.यासाठी पालिका तीन हजार कोटींचा खर्च करणार असून याबाबतच्या प्रस्तावांना विधानसभा निवडणूक आचारसंहितेआधीच मंजुरी मिळाली आहे.
पालिकेने यापूर्वीच शीव रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतींचा पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. दुसर्या टप्प्यातील हा पुनर्विकास असून १३ व १४ मजल्यांच्या एकूण चार इमारतींचे बांधकाम आणि दोन रुग्णालय इमारतींना जोडणारे पादचारी पूल आदी काम करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राजावाडी रुग्णालयाचाही पुनर्विकासाचे काम केले जाणार आहे. राजावाडी रुग्णालयाच्या जागेचा पुनर्विकास करून नवीन इमारत बांधली जाणार आहे. यासाठीदेखील आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंजुरी मिळाली आहे.पूर्व उपनगरांतील राजावाडी रुग्णालयावरील वाढलेला रुग्णांचा ताण लक्षात घेता या रुग्णालयाच्या जागेचा पुनर्विकास करून नवीन रुग्णालय इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तळ घर,तळ मजल्यासह १० मजल्यांची इमारत बांधली जाणार असून यासाठी सुमारे ६६५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.तब्बल १०२० खाटांचे हे रुग्णालय बांधले जाणार आहे.