मुंबई- मुंबई महानगरपालिकेतील एक अतिरिक्त महापालिका आयुक्त भ्रष्टाचाराचे सगळे रेकॅार्ड तोडत आहे. पालिकेतील या भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही तात्काळ नोटीस द्या. त्याच्यावर कारवाई करण्याची हीच योग्य वेळ आहे. नाही तर एका अधिकाऱ्यामुळे तुमचे सरकार अडचणीत येईल, असा इशारा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
मोहित कंबोज यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. कंबोज यांच्या पोस्टमध्ये लिहिले की या अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार पराकोटीला गेला असून याचे तोंड म्हणजे गटार आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची हिच योग्य वेळ आहे. अन्यथा या अधिकाऱ्याचे नाव पुराव्यासह उघड करण्यात येईल.