पहलगाम हल्ल्यातील दोन काश्मिरी दहशतवाद्यांची घरे उडवली! ‌‘बुलडोझर‌’ शिक्षा! नातेवाईक मात्र संतप्त


मुंबई- पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू आहे. यातील आदिल गुरी आणि असिफ शेख हे काश्मीरचेच रहिवासी आहेत. आज त्यांना उत्तर प्रदेशात गाजलेली बुलडोझर शिक्षा करण्यात आली. आदिल गुरीचे त्राल भागातील बिजबिहारा येथे असलेले घर स्फोट करून उद्ध्वस्त करण्यात आले तर असिफ शेख याच्या घरावर बुलडोझर फिरवून घर पाडण्यात आले. या घटनांमुळे या दोघांचे नातेवाईक मात्र प्रचंड संतापले आहेत.
आज राष्ट्रीय सुरक्षा दलाचे सैनिक आदिल गुरी आणि असिफ शेखच्या घरी पोहोचले. त्यावेळी घराचा तपास करताना आक्षेपार्ह वस्तू सापडल्या. आदिलच्या घरात स्फोटके आढळली. त्यांचा अचानक स्फोट झाला. सुदैवाने स्फोट होण्याआधी सैनिक घराबाहेर गेल्याने बचावले. दुसरा दहशतवादी असिफ शेखच्या घरातही आक्षेपार्ह वस्तू सापडल्यानंतर त्याचे घर बेकायदा ठरवून त्यावर बुलडोझर फिरवले.
या कारवाईने आदिल गुरुचे शेजारी आणि त्याच्या बहिणी प्रचंड संतापल्या होत्या. त्यांनी आरोप केला की, सैन्यानेच घरात स्फोटके ठेवून स्फोट घडविला. आदिलची एक बहीण म्हणाली की, गेली अनेक वर्षे आदिल घरी आलेला नाही. घरच्यांशी त्याचा काही संबंध नाही. तीन अविवाहित बहिणी, अपंग बाप व आजारी आई यांना सोडून तो सरळ निघून गेला. जे घर सैन्याने स्फोटाने पाडलेे ते घर आदिलच्या नावावरही नाही. आदिलच्या घराच्या शेजारी राहणारी युवती म्हणाली की, आदिल कधी या ठिकाणी आहे असे एसपी, डीएसपी सांगतात तर कधी दुसऱ्या ठिकाणी असल्याचे सांगतात. तो कुठे आहे हे माहीत असेल तर त्याला पकडत का नाही? मी त्याला बालपणी बघितले आहे. त्यानंतर मी त्याला कधीच बघितले नाही. गेले दोन दिवस सैन्याने आम्हाला घरात डांबून ठेवले आहे. काल सैनिक त्याच्या घरात घुसले, त्यांनी घरच्यांना बाहेर काढले, गाईगुरे दूर नेण्यास सांगितले. मग पहाटे 1 च्या सुमारास एक सैनिक त्या घरात घुसला आणि नंतर तो बाहेर आला. त्यानंतर स्फोट झाला. सैनिकांनीच स्फोट घडवून आणून हे घर पाडले आहे.
दरम्यान दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला आज 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी स्वतः श्रीनगरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी सैन्याला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. भारताने पाकिस्तान सीमेजवळ राजस्थानच्या थार वाळवंटात लष्करी सरावही सुरू केला आहे.
आज काँग्रेस नेते राहुल गांधी श्रीनगरला पोहोचले. त्यांनी 92 बैस लष्करी रुग्णालयात जाऊन हल्ल्यातील जखमींची विचारपूस केली.
श्रीनगरमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की, दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी प्रत्येक भारतीयाने एकजूट दाखवणे खूप महत्त्वाचे आहे. काही लोक काश्मीर आणि देशातील माझ्या बंधू आणि भगिनींवर हल्ला करत आहेत हे पाहून दुःख होते. आपण सर्वांनी एकत्र येत या घृणास्पद कृतीशी लढणे आणि दहशतवादाला कायमचे पराभूत करणे खूप महत्त्वाचे आहे. सर्व काश्मिरी जनतेने या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी देशवासीयांना पाठिंबा दिला आहे. मी एका जखमीला भेटलो. इतरांना मला भेटता आले नाही. परंतु ज्यांनी आपले प्रियजन गमावले, त्यांच्या प्रती माझ्या मनात अपार दुःख आहे. मी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि उपराज्यपालांनाही भेटलो. त्यांनी मला घडलेल्या घटनेची माहिती दिली. मी दोघांनाही सांगितले की, आमचा पक्ष आणि मी या प्रकरणात त्यांना पूर्ण पाठिंबा देणार आहोत.

Share:

More Posts