नवी दिल्ली- काश्मीरच्या पहलगाममध्ये काल झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे आज तीव्र पडसाद उमटले. या भ्याड हल्ल्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन हल्ल्याबाबत चर्चा केली. सौदी अरब दौरा अर्ध्यावर सोडून दिल्लीत परतलेले पंतप्रधान मोदी यांनी विमानतळावरच सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनआयए) हल्ल्याचा तपास वेगाने सुरु केला असून संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रे जारी केली. रात्री भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेतला. अटारी वाघा चेक पोस्ट बंद करण्याचे, सिंधु जल करार स्थगित करण्याचे आणि पाकिस्तानी नागरिकांना 24 तासांत भारत सोडण्याचे आदेश मंत्रालयाने संबंधित विभागाला दिले.
पहलगाममध्ये काल झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे आज तीव्र पडसाद उमटले. या भ्याड हल्ल्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याबाबत चर्चा केली. सौदी अरब दौरा अर्ध्यावर सोडून दिल्लीत परतलेले पंतप्रधान मोदी यांनी विमानतळावरच सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनआयए) हल्ल्याचा तपास वेगाने सुरु केला असून संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रे जारी केली. या भ्याड हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला.
घटनेचे गांभीर्य ओळखून गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगामच्या बैसरन पठारावर जाऊन घटनास्थळाचा आढावा घेतला. हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले.
या हल्ल्यात एकूण 27 जणांचा बळी गेला. तर सोळा जण जखमी झाले. महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. मयत अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले हे तिघेजण ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीचे रहिवासी आहेत. पुण्याचे कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे आणि नवी मुंबईतील पनवेलचे दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला. या सहा जणांचे पार्थिव तीन स्वतंत्र विमानांनी आज मुंबई आणि पुण्यात आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. सायंकाळी अतुल मोने आणि देसले यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी विमानतळावर उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. मुंबईत भाजपा आमदार रवींद्र चव्हाण, आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांनी विमानतळावर नातेवाईकांना मदत केली. त्यानंतर देसले यांचे पनवेलमध्ये आणि संजय लेले यांचे डोंबिवलीत रात्री पार्थिव दाखल झाले. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या विशेष विमानाने हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव मुंबई विमानतळावर आणले. त्यानंतर त्यांचे पार्थिव डोंबिवलीत रात्री दाखल झाले. लेले, जोशी आणि मोने या मावस भावांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी डोंबिवलीच्या भाग शाळा मैदानात ठेवण्यात आणले. दुसऱ्या बाजूला देसले यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील डोंबिवलीत पोहोचले आणि मृत व्यक्तींच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांच्या उपस्थितीत तिन्ही मावस भावांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर पुण्यात आमदार माधुरी मिसाळ आणि मंत्री मुरलीधर मोहोळ हे मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्यास सज्ज होते.
महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाराज काश्मीरमध्ये पोहोचले. त्यांनी अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. उद्या विशेष विमानाने सर्व पर्यटकांना मुंबईत नेणे जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
रात्री भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानाविरोधात कठोर निर्णय घेतले. पाकिस्तानी नागरिकांना 24 तासांत भारत सोडण्याचे, पाकिस्तानी लोकांसाठी व्हिजा बंद करण्याचे, पाकिस्तानातील भारतीय राजदूत परत बोलावण्याचे, भारतातील पाकिस्तानी उच्चआयुक्तालय बंद करण्याचे, अटारी- वाघा सीमेवरील परेड बंद करण्याचे, सिंधू पाणी कराराला स्थगित देण्याचे आदेश भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने संबंधित विभागांना दिले आहेत.
महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अजूनही जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. जालना, नांदेड, धाराशिव, परभणी, बीड, भंडारा, जळगाव, सांगली, संगमनेर, बुलडाणा आणि कोल्हापूर येथील शेकडो पर्यटकांचा त्यामध्ये समावेश आहे.
पान 1 वरून- भाग्यश्री ट्रॅव्हलचे 26 पर्यटक, राजा राणी ट्रॅव्हलचे 1000 पर्यटक, जळगावच्या 16 महिला पर्यटक आणि वाघूळदे कुटुंबाचे 5 सदस्य, नागपुरच्या रुपचंदानी कुटुंबाचे 3 सदस्य, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा देवयानी ठाकरे व त्यांच्याबरोबर असलेले 14 सहकारी हे श्रीनगरच्या आसपास अडकले आहेत. पण सुखरुप आहेत. या सर्व पर्र्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या पर्यटकांना आणण्यासाठी इंडिगो कंपनीकडून अतिरिक्त विमानांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.
काश्मीरमधील स्थानिक जनतादेखील या हल्ल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरली. स्थानिकांनी पर्यटकांना सर्वतोपरी मदत केली. श्रीनगर आणि पहलगाममध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. दल सरोवर येथे एकही पर्यटक नव्हता. यामुळे स्थानिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून ते स्थानिक दहशतवाद्यांवर भडकलेले आहे. काश्मीर सरकारने हल्ल्याचा कडाडून निषेध केला असून हल्ल्यामध्ये बळी गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये, गंभीर जखमी झालेल्यांना 2 लाख रुपये तर किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. संपूर्ण पहलगाममध्ये एनआयएची पथके, सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी आज पहाटेपासून शोधमोहीम राबविली. मात्र दहशतवाद्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ खालीद हा या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सैफुल्लाहचा एक व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला. पाकव्याप्त काश्मीरमधील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात आले. या व्हिडिओमध्ये सैफुल्लाह लोकांना भारताविरूद्ध चिथावणी देताना दिसत आहे. मोदी सरकार मुसलमानांना दाबण्याचा प्रयत्न करत असून सरकारला जशास तसे उत्तर दिले नाही तर मुसलमानांचे भारतात अस्तित्वच शिल्लक राहणार नाही, मोदींनी 370 कलमही रद्द केले. असे चिथावणीखोर भाषण सैफुल्लाह याने केले होते. भारतावर हल्ले केले जातील, अशी धमकीही त्याने या भाषणात दिली आहे. सैफुल्लाह हा प्रामुख्याने पहलगाम आणि अनंतनाथ येथे कार्यरत आहे. या दृष्टीनेही एनआयए तपास करीत आहे.
हल्ल्यातून बचावलेल्या प्रत्यक्षदर्शींना दहशतवादी कसे दिसत होते हे विचारून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी तयार केलेली रेखाचित्रे आज जारी करण्यात आली. या रेखाचित्रांच्या आधारे तपास यंत्रणांना दहशतवाद्यांचा शोध घेण्यात मदत होणार आहे. आसिफ फौजी, सुलेमान शहा आणि अबू तल्ला, मोहम्मद असिफ शेख अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दहशतवादी दोन आठवड्यांपूर्वी काश्मीरच्या राजौरीमधून वाधवानमार्गे पहलगाममध्ये दाखल झाले होते. तिथे त्यांनी एका दुचाकीवरून पर्यटनस्थळांची आणि खास करून बैसरान पठाराची रेकी केली होती, असेही पोलीस तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी ही दुचाकी जप्त केली आहे. हल्ल्यात मरण पावलेल्या अन्य राज्यांमधील पर्यटकांची यादी आज राज्य सरकारने जाहीर केली. मंजुनाथ शिवामू आणि शिवम मोग्गा (कर्नाटक), शुभम द्विवेदी (उत्तर प्रदेश), संदीप नेवपाने (नेपाळ), उधवानी प्रदीप कुमार (युएई) सैयद हुसेन शहा (जम्मू आणि काश्मीर), हिंमतभाई कालाथिया आणि प्रशांत कुमार बालेश्वर, मनिष रंजन (गुजरात), रामचंद्रन आणि शालिंदर कलपिया यांचा समावेश आहे. जखमींमध्ये विनीभाई, माणिक पटेल, रिनो पांडे (गुजरात), एस. बालचंद्र (महाराष्ट्र), डॉ. परमेश्वरमे (तामिळनाडू), अभिजवम राव (कर्नाटक), सांतरू (तामिळनाडू), शशी कुमारी (ओडिशा), सोभीत पटेल (महाराष्ट्र) आदिंचा समावेश आहे.
हल्ल्याचा सूत्रधार खालिदचा इशाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल
पहलगाम हल्ल्यात दोन परदेशी दहशतवादी आणि दोन स्थानिक दहशतवादी यांचा सहभाग होता अशी माहिती आहे. लष्कर ए तोएबाचा सैफुल्ला कसुरी उर्फ खालिद आणि दोन कमांडर या हल्ल्याचे सूत्रधार आहेत असेही स्पष्ट झाले आहे . पाकव्याप्त काश्मीरच्या रावळकोट येथून सैफुल्ला संघटना चालवतो. तेथेच या हल्ल्याचा कट रचला. या कटात स्थानिक 6-8 दहशतवादी होते. हल्ल्यापूर्वी त्यांनी दोन दिवस परिसराची रेकी केली होती. गुप्तचर विभागाला हल्ल्याच्या कटाबद्दल माहिती मिळाली होती. सैफुल्ला कसुरी उर्फ खालिदचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे . यामध्ये तो म्हणाला आहे की, मोदींनी राम- राम करणाऱ्यांना श्रीनगर व इतर भागात वसवण्यासाठी 370 कलम हटवले. ते कलम हटवले तेव्हा न्यायमूर्ती आणि दस्तावेज तुमचे होते. त्यांना शरीयत कायदा संपवायचा आहे. या सर्व गोष्टी मुस्लीम अल्पसंख्याकांना संपवण्यासाठी सुरु आहे. आता अल्लाहच्या इच्छेने आम्ही तुम्हाला गोळ्यांनी मारू. आमच्या धर्मावर घाला घालणाऱ्यांना बिनतोड उत्तर देऊ. या भाषणानंतर दोन दिवसांनी हल्ला झाला.
