*हायकोर्टाने फटकारताच
राज्य सरकार नरमले
मुंबई- ऐन पावसाळ्यात पवईतील जयभीम नगर येथील झोपड्यांवर केलेल्या कारवाईचे प्रकरण पवई पोलीस ठाण्यातून साकीनाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते.यावर उच्च न्यायालयाने फटकारताच राज्य सरकार पुरते नरमले.अखेर या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात आला असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली.
पवईच्या जयभीम नगरात पालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर येथील रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.ऐन पावसाळ्यात शेकडो झोपडीधारकांवर ही तोडक कारवाई केल्याबद्दल पालिका आणि पोलिसांवरच कारवाई करावी.तसेच या झोपडीधारकांना भरपाई देण्याची विनंती केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते- ढेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.यावेळी या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपविला असून अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मीना हे या पथकाचे प्रमुख असतील असे राज्य सरकारने सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने पवई पोलिसांकडून साकीनाका पोलिसांकडे वर्ग केला होता. यावरुन यापुर्वी झालेल्या सुनावणीत हे प्रकरण दुसरीकडे वर्ग का करण्यात आले? प्रकरणाची पोलीस नोंदवही (डायरी) कुठे आहे? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला करत फटकारले होते.त्यानंतर काल सरकारने सपशेल माघार घेत हा तपास एसआयटीकडे सोपविण्यात असल्याची माहिती न्यायालयास दिली.