बीड- अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे एका युवकाने भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून तणाव निर्माण झाला. याप्रकरणी काल सकल ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाजाच्या वतीने पाथर्डी बंदची हाक देण्यात आली होती. या घटनेचे पडसाद आता बीडमध्येही उमटले आहेत. आज बीड जिल्ह्यातील शिरूर बंदचे आवाहन करण्यात आले. शिरुरमध्ये आज सर्व दुकाने आणि छोटे व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरु ठेवण्यात आली होती.
पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका युवकाने पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवले. या प्रकारानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी संबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी शिरापूर येथील संबंधित तरुणाच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित युवकावर आचारसंहिता भंग आणि स्टेटस ठेवून सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.