नाशिक- नाफेडच्या माध्यमातून उन्हाळी कांद्याऐवजी लाल कांदा बाजारात विक्रीसाठी पाठवून शासनाची, शेतकऱ्यांची व ग्राहकांची फसवणूक होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भारतीय किसान संघाच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, नाफेड व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सहा महिन्यांपूर्वी रब्बी उन्हाळी कांदा खरेदी केला. आता केंद्र शासनाने कांदा दर नियंत्रणासाठी कांदा टंचाई असलेल्या भागात नाफेडच्या माध्यमातून कांदा पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात उन्हाळी कांद्याऐवजी बाजार समितीमधून अत्यंत निकृष्ट दर्जाचा लाल कांदा खरेदी करून उत्तर भारतात तो कांदा पाठवला जात असल्याचे समोर आले आहे.नित्कृष्ट दर्जाच्या कांद्यामुळे तेथील बाजारभावात घसरण झाली. त्यामुळे कांदा बाजारभाव कमी झाल्याने अतोनात नुकसान होत आहे. ग्राहकांना निकृष्ट दर्जाचा कांदा खरेदी करावा लागत आहे. यामध्ये संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्या आणि नाफेड संगनमत करून शासनाची फसवणूक करत आहे. कांदा निर्यात प्रक्रिया अजूनही सुरु आहे. त्यामुळे शासनाची, शेतकरी व ग्राहकांची फसवणूक करून निकृष्ट दर्जाचा कांदा पाठविणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आहे .