नवी मुंबई – नवी मुंबईतल्या सेक्टर 19 इथल्या शहाबाज गावातली इंदिरा निवास ही 3 मजल्यांची इमारत आज पहाटे पावणेपाचच्या सुमारास कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. या दोघांना वाशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर एका व्यक्तिचा शोध सुरू आहे. एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी हजर असून शोधकार्य सुरू आहे.2013 मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. कोसळलेल्या इमारतीमध्ये 3 गाळे आणि 17 निवासी घरे होती. पहाटे अचानक इमारतीला हादरा बसल्यानंतर नागरिक घाबरून घराबाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आतापर्यंत इमारतीत राहणारे 40 रहिवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. सध्या या ठिकाणी अग्निशमन दल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग कर्मचारी हजर असूनढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.