जालना – माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी सामान्य कार्यकर्त्याला लाथ मारल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या घटनेवर विरोधकांनी दानवे यांच्यावर टीका केली आहे.
काल शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. कट्टर विरोधकांची दिलजमाई होण्याचा हा प्रसंग होता. या भेटीवेळी फोटो काढण्यासाठी दानवे आणि खोतकर उभे राहिले होते. तेव्हा एक कार्यकर्ता त्यांच्या बाजूला उभा राहिला. यावेळी दानवे यांनी कार्यकर्त्याला लाथ मारत बाजूला केले.
भाजपामध्ये कार्यकर्त्याला कसे वागवले जाते, त्याचे हे लक्षण असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तर भाजपाच्या नेत्यांना विचारा ही त्यांच्या पक्षाची संस्कृती आहे का ? तुमच्या पक्षात कार्यकर्त्याची काय भूमिका आहे ? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.