मुंबई – दादर पूर्वेकडे रेल्वेस्थानकाला लागून असलेले हनुमान मंदिर हटविण्याबाबत रेल्वे प्रशासनाने बजावलेल्या नोटिशीवरून आज भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. हनुमान मंदिराच्या परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हनुमान मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आणि त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यामुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सायंकाळी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मंदिरात महाआरती करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन हनुमान मंदिराला बजावण्यात आलेल्या नोटिशीवरून भाजपावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात हनुमान मंदिराचा मुद्दा चर्चेला आला. कोणत्याही परिस्थितीत या 80 वर्षे जुन्या मंदिराला हात लावू देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने अवघ्या दोन तासांत नोटीस मागे घेतली. मात्र तरीही आज या मुद्यावरून भाजपा आणि ठाकरे गटात वाद झाला.
सोमय्या यांनी सकाळी या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. हनुमान मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार अशी घोषणा केली. विधानसभा निवडणुकीच्या धर्मयुध्दात उद्धव ठाकरे यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या हातून त्यांचा पक्षही निसटला आहे. त्यांच्याकडे जी काही थोडीबहूत शिवसेना उरली आहे ती मरणपंथाला लागली आहे, म्हणून उद्धव ठाकरेंना राम आठवला असावा, अशी घणाघाती टीका किरीट सोमय्या यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे संतप्त शिवसैनिक सोमय्या येण्याच्या आधीपासून मोठ्या संख्येने मंदिर परिसरात जमले होते. सोमय्या मंदिर परिसरात येताच त्यांनी सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रत्युत्तरादाखल भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घड़ला नाही.
सोमय्या यांनी हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, मंदिराला रेल्वे प्रशासनाकडून पाठविण्यात आलेली नोटीस ही कनिष्ठ अधिकार्याकडून झालेली चूक होती. वरिष्ठ अधिकार्यांनी दोन तासांतच या नोटिशीला स्थगिती देत कोणतेही मंदिर पाडले जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.असे असताना उद्धव ठाकरे जे काही करीत आहेत ती नौटंकी आहे. विधानसभा निवडणुकीत व्होट जिहाद करणारे, हनुमान चालिसा पठण करणार्यांना तुरुंगात टाकणाऱे उद्धव ठाकरे यांना आता पालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर हिंदुत्वाची आठवण झाली आहे. त्यांचा खरा चेहरा लोकांना दिसला आहे, असे सोमय्या म्हणाले. यामुळे उबाठा कार्यकर्ते भडकले होते.
सायंकाळी ठरल्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी हनुमान मंदिरात महाआरती केली. याप्रसंगी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अनिल देसाई, सचिन आहीर आदि नेते उपस्थित होते.