अयोध्या- उत्तर प्रदेशात सध्या थंडीची लाट सुरु असून अयोध्येतील तापमान ३ ते ६ अंशापर्यंत खाली आले आहे. या हिवाळ्यात प्रभू रामलल्लांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांना विशेष लोकरीची वस्त्रे परिधान केली जाणार आहे. ही वस्त्रे दिल्लीतून अयोध्येत आली आहेत.
रामलल्लांना लोकरीचे धोतर नेसवण्यात येणार असून ते कुलू येथील लोकरीपासून तयार करण्यात आले आहे. त्यांच्या अंगावरील उत्तराय हे लडाखमधील पश्मिना लोकरीपासून तयार करण्यात आले आहे. या वस्त्रावर खास ऋतुनुसार नक्षीकाम केले गेले आहे. या नक्षीकामात रामलल्लांचे पावित्र्य व परंपरेचा विचार करण्यात आला आहे. मनिष त्रिपाठी यांनी या वस्त्रांचे नक्षीकाम केले आहे. जसजशी थंडीत वाढ होईल त्याप्रमाणे या वस्त्राचे नक्षीकाम बदलले जाणार आहे. या नव्या लोकरीच्या वस्त्रांमुळे रामलल्लांना ऊब मिळेल. यासाठी दोन उपरणे आणण्यात येणार असून एक त्यांच्या खांद्यावर व दुसरे त्यांच्या हातात असेल. ही दोन्ही वस्त्रेही उत्कृष्ट प्रकारच्या पश्मिना लोकरीपासून तयार करण्यात आली आहेत. हिवाळ्याच्या दिवसात रामलल्लाचे रक्षण करण्यासाठी मंदिरातील पुजाऱ्यांनी विविध उपायही केले आहेत. आम्ही रामलल्लाची काळजी मुलाप्रमाणे घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रामलल्लाच्या सकाळच्या अभिषेकासाठी उष्णोदक वापरण्यात येत असून मंदिराच्या गाभाऱ्यात हिटरही लावण्यात आलेले आहेत.
राममल्लाच्या केवळ वस्त्रातच नव्हे तर त्यांच्या दैनंदिन नैवेद्यामधील पदार्थही हिवाळ्याचा विचार करुन बदल करण्यात आला आहे. पहाटेच्या मंगल आरतीला पेढे व सुकामेवा तर नंतर होणाऱ्या श्रृंगार आरतीला फळे व सुकामेवा दाखवण्यात येत आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता रामलल्लांना पोहे किंवा देशी तुपातील हलवा अर्पण करण्यात येत असून दुपारच्या भोजनासाठी राजभोग अर्पण करण्यात येत आहे. या संपूर्ण भोजनात खीर व इतर पदार्थही आहेत. विश्रांतीनंतर दुपारी दीड वाजता मिठाई व नारळ पाणी अर्पण करण्यात येत आहे. तर दुपारी चार वाजता विविध खाद्यपदार्थ त्याचबरोबर नारळाचे पाणी व फळांचा रस अर्पण करण्यात येत आहे. हिवाळ्याच्या दिवसांसाठी रामलल्लाची सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असल्याचे मंदिराचे सहाय्यक पुजारी संतोष कुमार तिवारी यांनी सांगितले आहे.