मुंबई- तमाशा कला अभ्यासक आणि गायक, नाट्यनिर्माते, लोककला क्षेत्रातील संघटक म्हणून प्रसिद्ध असलेले मधुकर नेराळे यांचे निधन झाल्याने तमाशा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासनाचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार, प्राचार्य पी. बी. पाटील सोशल फोरम शांती निकेतन पुरस्कार, सांगलीचा कर्मयोगी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
मधुकर नेराळे यांचे वडील पांडुरंग नेराळे यांनी लालबाग मार्केटमध्ये मुख्य रस्त्याच्या बाजूला जागा भाड्याने घेऊन १९४९ पासून तिथे तमाशाचे खेळ सुरू केले. त्यातून गिरणी कामगार असलेल्या या भागात न्यू हनुमान थिएटर उभे राहिले. हे थिएटर तमाशा कलावंतांसाठी, ढोलकी फडाच्या तमाशा कलावंतांसाठी, लोककलावंतांसाठी आधार केंद्र बनले. १९५८ साली मधुकर नेराळे यांचे पितृछत्र हरपले. नाउमेद न होता त्यांनी हे थिएटर सुरूच ठेवले. माधव नगरकर, विठाबाई नारायणगावकर, तुकाराम खेडकर, दत्ता महाडिक पुणेकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, काळू बाळू, दादू इंदुरीकर अशा ढोलकी फडाच्या तमाशा कलावंतांनी या थिएटरमध्ये रसिकांचे मनोरंजन केले. मुंबईत तमाशाची १९ थिएटर होती. ती सर्व बंद झाली. १९९५ साली न्यू हनुमान थिएटरही बंद झाले.