कोल्हापूर- कर्नाटकातील सौंदत्ती गडावर यल्लम्मा म्हणजेच श्री रेणुका देवीची यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली.पण ज्यांना सौंदत्ती डोंगरावर जाता आले नाही त्यांच्यासाठी धर्म जागरण समितीमार्फत तब्बल ६०० वर्षानंतर प्रथमच यल्लमा देवीचा रथ कोल्हापुरात आणण्यात आला आहे. यामध्ये देवीचा जग टाक, कलश आणि पादुका डोंगरावरून रथाच्या माध्यमातून भक्तांसाठी दर्शनासाठी आणण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात २० ते २९ डिसेंबर दरम्यान रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा शुभारंभ नुकताच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये पार पडला. जिल्ह्यातील जवळपास ७० गावांमध्ये ही रथयात्रा जाणार आहे. रेणुका मातेच्या जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचून त्यांना या रथयात्रेचा दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.सौंदत्ती येथे होणाऱ्या रेणुका देवीच्या यात्रेसाठी कर्नाटक,महाराष्ट्र,
गोवा,आंध्रप्रदेश आणि केरळ इथून लाखो भाविक दर्शनाला येत असतात. येथे राहणाऱ्या असंख्य भक्तांची यलम्मा ही कुलस्वामिनी आहे. मात्र, काही भक्तांना या काळात हे दर्शन घेणे शक्य नसते. त्यामुळे धर्म जागरण समितीमार्फत हा रथयात्रेचा उपक्रम राबवण्यात आला आहे.