झोप कशी घ्यावी! 6 सत्रांचा कोर्सअमेरिकेतील शाळांमध्ये नवा अभ्यासक्रम

ओहायो- अमेरिकेच्या ओहायोतील मॅन्सफिल्ड शाळेत व इतर शाळांमध्ये ‘झोप कशी घ्यावी?’ हा विषय आता शिकवला जाणार आहे. त्याचा 6 सत्रांचा विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. पुरेशी झोप न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे . त्यामुळेच अमेरिकेतील शाळांनी आता झोप कशी घ्यावी, हे विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली आहे.

सध्या सोशल मीडियाचा प्रभाव इतका वाढला आहे की, लहान मुलेही रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत जागत असतात. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. हे व्यसन किशोरवयीन मुलांमध्ये अधिक आढळत असले तरी लहानगेही त्यापासून दूर नाहीत. पुरेशी झोप पूर्ण न होणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरते. लक्ष केंद्रित होणे आणि आनंदी राहणे यासाठी झोप आवश्यक आहे. त्यामुळे झोप कशी घ्यावी याचे शिक्षण ही गरज बनली आहे. यातून या अभ्यासक्रमाची संकल्पना पुढे आली. मॅन्सफिल्ड शाळेत स्लीप टू बी ए बेटर यू या नावाने याचा अभ्यासक्रम सुरू केला असून टोनी डेव्हिस याचे प्रमुख आहेत. ते म्हणतात की, शाळेमध्ये मुलांना झोप घ्यायला शिकवावे लागते हे विचित्र वाटेल. अनेक मुलांना झोप कशी घ्यावी हे खरेच माहितीच नसते. संशोधनातून उघड झाले आहे की, बहुतांश मुले फक्त 6 तास झोप घेतात. त्यांना 8 ते 10 तास झोपेची गरज असते. शारीरिक वाढ, हार्मोन्समधील बदल, तणाव, स्क्रीन टाइम आणि अभ्यासाचा ताण या सगळ्याचा त्यांच्या झोपेवर दुष्परिणाम होतो. झोपेची कमतरता ही आपण समजतो तेवढी साधी गोष्ट नाही. चिंता, नैराश्य, धोकादायक वर्तन, खेळातील दुखापती आणि अपघातांशीदेखील कमी झोपेचा संबंध आहे.

या शाळेतील नववीतील विद्यार्थ्याने कबूल केले की, तो रात्री मान दुखेपर्यंत टिकटॉक बघत राहतो. आणखी एक किशोरवयीन मुलगी म्हणते की, तिला मित्रांसोबत रात्री उशिरा ग्रुप चॅट करायची सवय आहे. रात्री उशिरापर्यंत जागण्याच्या सवयीमुळे अनेक विद्यार्थी दुसर्‍या दिवशी शाळेत बाकावर झोपलेले असतात. स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशनचे व्याख्याते डेनिस पोप यांनी कॅलिफोर्नियातील शाळांत याविषयी सर्व्हे केला. ते म्हणतात की, अमेरिकेच्या कुठल्याही शाळेत गेलात तर झोपाळलेली मुले दिसतील. झोपेचा थेट तुमच्या मानसिक आरोग्याशी संबंध असतो. याबाबतीत कुठलाही वाद असू शकत नाही. किशोरवयीन मुलांना त्यांच्या शरीराचा आणि मेंदूचा विकास लक्षात घेता 10 तासांची झोप आवश्यक आहे. परंतु 80 टक्के मुले पुरेशी झोप घेत नाहीत, असे युएस सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने म्हटले आहे.