नारायणगाव – जुन्नरच्या ‘शिवनेरी हापूस’ आंब्याला केंद्र सरकारने भौगोलिक मानांकन (जीआय) बहाल केले आहे. जीआय मानांकन देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मानांकन समितीने स्वीकारला आहे. भारत सरकारने प्रकाशित केलेल्या भौगोलिक उपदर्शन पत्रिकेत ‘शिवनेरी हापूस’ आंब्याला भौगोलिक मानांकन मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जुन्नर तालुक्यात आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हा हापूस आंबा वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी ओळखला जातो. त्यामुळे जुन्नरच्या हापूस आंब्याला ‘शिवनेरी हापूस’ म्हणून जीआय मानांकन मिळावे, यासाठी नारायणगावचे ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र प्रयत्नशील होते. यासाठी खासदार डॉ.कोल्हे हे २०२२ पासून सातत्याने पाठपुरावा करीत होते.त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून काश्मिरी केशर, बनारसी साडी किंवा दार्जिलिंग चहा या धर्तीवर जुन्नर तालुक्यातील आंब्याला ‘शिवनेरी हापूस आंबा’ अशी ओळख मिळाली आहे.यासंदर्भात खासदार डॉ.कोल्हे म्हणाले की, जुन्नरच्या ‘शिवनेरी हापूस’ आंब्याला जीआय मानांकन मिळावे, यासाठी ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. त्यानुसार वेळोवेळी प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून करण्यात आली. या भागाचा लोकप्रतिनिधी खासदार म्हणून मी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करीत होतो. त्यामुळे शिवनेरी हापूसला जीआय मानांकन मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलता आला,याचा विशेष आनंद आहे.