छत्तीसगड
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत १ नक्षलवादी ठार झाला. सुरक्षा दलाचे एक पथक नक्षलविरोधी ऑपरेशन राबवत असताना तोलनई आणि टेटराई गावांदरम्यानच्या जंगलातील टेकडीवर ही चकमक झाली. या घटनेमुळे या वर्षी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या १०५ वर पोहोचली आहे.
तोलनई आणि टेटराई गावांदरम्यानच्या जंगलातील टेकडीवर नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे काल रात्री उशिरा सुरक्षा दलाने शोध मोहिम सुरु केली. त्यानंतर आज सकाळी १ नक्षलवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले. तसेच या ठिकाणावरून एक बंदूक आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. सुरक्षा दलाचे अधिकारी ठार झालेल्या नक्षलवाद्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.