छ. संभाजीनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जिरी गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका ६५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. झुंबरबाई मांदाळे असे या महिलेचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ५ वाजता घडली. महिला घरासमोर उभी असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. सुमारे दहा मिनिटे बिबट्या आणि महिला यांच्यात झुंज सुरू होती. या संघर्षात बिबट्याने महिलेला सुमारे १०० मीटर अंतरावर फरपटत नेले. अखेरीस या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. यासंदर्भात वनविभागाला सकाळी साडेसहा वाजता माहीती देण्यात आली, मात्र दहा वाजेपर्यंत वनविभाग हजर नव्हता. जो पर्यंत बिबट्याचा बंदोबस्त वनविभाग करत नाही तो पर्यंत अंत्यविधी होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. गेल्या ३ महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे.