मुंबई – घाटकोपर येथील महाकाय फलक दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला सत्र न्यायालयाने १९ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता.सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान देत त्याचा जामीन रद्द करण्याची मागणी केली.
फलक दुर्घटनेसाठी भिंडे प्रामुख्याने जबाबदार होता याचे ठोस पुरावे आपल्याकडे आहेत. याशिवाय, या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला हे एकमेव आणि गंभीर कारण भिंडे याचा जामीन रद्द करण्यासाठी आणि या प्रकरणातून दोषमुक्तीच्या त्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी पुरेसे आसल्याचे सरकारने याचिकेत म्हटले आहे. फलक दुर्घटनेनंतर जनतेत निर्माण झालेला संताप कमी करण्याच्या एकमेव उद्देशाने आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा करून भिंडे याने प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. सत्र न्यायालयाने पोलिसांना त्याच्या अर्जावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.