अहमदाबाद – गुजरातच्या बनासकांठा येथील दीपक ट्रेडर्स नावाच्या फटाक्याच्या कारखान्यात आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. त्यानंतर कारखान्यात आग लागून १७ कामगारांचा मृत्यू झाला. तर ४० टक्क्यांहून अधिक भाजलेल्या ३ कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्फोट झाला त्यावेळी कारखान्यात ३० कामगार होते. स्फोटाचा आवाज ऐकताच आसपासचे लोक कारखान्याजवळ पोहोचले. त्यावेळी कारखान्यातून आगीच्या मोठाल्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. संपूर्ण परिसर धुराचे लोट पसरले होते. स्थानिकांनी याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर डीसा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
हा स्फोट इतका भीषण होता की, अनेक कामगारांच्या शरीराचे अवयव कारखान्यात सर्वत्र विखुरले गेले. कारखान्याच्या मागे असलेल्या शेतातही काही अवयव सापडले. या स्फोटामुळे गोदामाचा काही भाग कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखालीही काही मजूर अडकले. कारखान्यातील ५ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
डीसाच्या उपजिल्हाधिकारी नेहा पांचाळ म्हणाल्या की, घटनेतील सर्व जखमींना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ३ जण ४० टक्क्यांहून अधिक भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
