गावसकर यांचीही आता मदत! कांबळीला दर महिना पैसे देणार


मुंबई- एकेकाळी सचिन तेंडुलकरबरोबर तुलना केली जाणारा भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी स्वतःच्या वर्तनाने सातत्याने शारीरिक आजार आणि आर्थिक अडचणीत सापडत आहेत. मात्र त्यांची क्रिकेट कारकीर्द आठवून सातत्याने त्यांना मदत मिळत राहिली आहे. आता सुनील गावसकर यांच्या संस्थेने कांबळीला महिना 30 हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. या आर्थिक मदतीतून तरी कांबळी यांची स्थिती कायमची सुधारेल अशी आशा आहे.
धड चालूही न शकणार्या विनोद कांबळीचा काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून त्यांचे चाहते मनोमन हळहळले होते. या कठीण काळात माजी कर्णधार सुनील गावस्कर हे त्याला मदत करणार आहेत.
कांजुरमार्ग येथील चाळीतून पुढे येऊन क्रिकेटपटू बनलेल्या विनोद कांबळीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी 104 एकदिवसीय आणि 17 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र त्याची कारकीर्द संपल्यावर त्याची अधोगती सुरू झाली . त्यांच्या वर्तनाने त्याला आजारपणाने ग्रासले. गेल्या वर्षी त्याला मूत्र संसर्ग आणि अंगावर पेटके आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक दिवस रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू होते. त्यावेळी सुनील गावसकर यांनी कांबळीला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. गावसकर यांची चॅम्प्स फाउंडेशन ही संस्थाअसून 1999 मध्ये सुरू झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून ते गरजू माजी खेळाडूंना मदत करतात. या फाउंडेशनकडून 1 एप्रिलपासून त्याला चॅम्प्स फाउंडेशनच्या माध्यमातून आयुष्यभर मासिक 30,000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त त्याच्या वैद्यकीय खर्चासाठी दरवर्षी 30,000 रुपयेदेखील दिले जाणार आहेत.
गावस्कर यांचे जवळचे मित्र आणि निर्लॉन संघातील सहकारी अनिल जोशी म्हणाले की, गेल्या वर्षी कांबळीची तब्येत बिघडल्याचे कळताच गावसकर यांना त्याला मदत करायची इच्छा होती. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्यांच्या भेटीच्या एक दिवसानंतर, गावसकर आणि मी कांबळीच्या दोन डॉक्टरांची भेट घेतली. त्याच्या प्रकृतीची पूर्ण माहिती घेतल्यानंतर, त्यांनी चॅम्प्स फाउंडेशनला तातडीने आर्थिक आणि वैद्यकीय मदत सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
विनोद कांबळीला काही वर्षांपूर्वी त्याचा जवळचा मित्र सचिन तेंडुलकरनेही मदत केली होती. सचिनने केलेल्या आर्थिक मदतीने त्याच्यावर दोन हृदय शस्त्रक्रियाही झाल्या आहेत. त्यानंतर काही कंपन्यांनी कांबळीला मदत केली . हा मदतीचा ओघ सुरूच असतो त्यात आता गावस्कर यांनी पुढाकार घेतला आहे.