मुंबई – वांद्रे पश्चिम येथील फॉर्च्युन एन्क्लेव्ह या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर आज पहाटे आग लागली होती. याच इमारतीच्या अकराव्या मजल्यावर प्रसिद्ध गायक शानचे निवासस्थान आहे. आग लागली तेव्हा गायक शान त्याच्या घरी उपस्थित होता. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी इमारतीतील नागरिकांना बाहेर काढून इमारत रिकामी केली. या घटनेमध्ये एका ८० वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. सध्या त्यांच्यावर जवळच्या एका खासगी रुग्णालयामध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. याशिवाय इमारतीचेही मोठे नुकसान झाले. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.