बारामती – राज्यात लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातील लढत गाजली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही बारामती चर्चेत आली आहे. त्यातच बारामतीत गब्बरच्या एका पत्राने खळबळ माजली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात एक पत्र आले होते. कालपासून व्हायरल झालेले गब्बरचे पत्र मात्र अजित पवारांची पाठराखण करणारे आहे.
गब्बरचे पत्र म्हणून व्हायरल झालेल्या या पत्रात म्हटले आहे की, बारामतीकरांनी नेहमीच साहेब, दादा, सुप्रिया ताईंवर प्रेम केले. त्यांना मतदानरुपी आशीर्वाद दिला आहे. परंतु सध्याच्या स्थितीत वातावरण गढूळ झाले आहे. स्थानिक नेत्यांच्या स्वप्नांचा चुराडा करण्यासाठी दादांची बदनामी करून त्यांना पायउतार करण्याचा डाव खेळला जात आहे. वहिनींच्या पराभवानंतर आता दादांनाही राजकीय शर्यतीतून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रचाराच्या नावाखाली जातीयवाद व पैसे वाटप करून मतदारांची फसवणूक केली जात आहे. या पत्राने बारामतीत खळबळ माजली आहे. या पत्राच्या आशयावरून हे पत्र अजित पवार गटाच्याच कोणीतरी लिहिले असून, त्यातून अजित पवारांच्याविषयी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कालच अजित पवार हे बारामतीत होते. त्यावेळी त्यांनी भावनिक भाषण करत बारामतीत सर्वच योजना आपणच कशा आणल्या हे सांगितले होते. तोच संदेश या पत्रातूनही वेगळ्या पद्धतीने दिला गेला आहे.
याआधी लोकसभा निवडणुकीत अशाच प्रकारचे एक बारामतीकराचे पत्र व्हायरल झाले होते. त्यात लिहिले होते की, शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांच्या त्यागामुळे अजित पवार पुढे आले होते. त्यानंतर त्यांनी घरामध्ये व पक्षात फूट पाडली. त्यामुळे त्यांचा पराभव करण्याचे आवाहन केले होते. त्या पत्राच्या शेवटी ‘वाजवा तुतारी, गाडा गद्दारी’ असेही आवाहन केले होते. त्याला उत्तर देत श्रीनिवास पवार यांच्या विरोधात एक पत्र व्हायरल करण्यात आले होते. कालपासून बारामतीत व्हायरल झालेले हे तिसरे
पत्र आहे.